महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी– गोखळी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत निरा नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र सखोल तपासानंतर हा प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासादरम्यान मृतदेहाची ओळख अंकुश बापू नरबट (वय २२, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा) अशी पटली. माण तालुक्यातील रहिवासी असलेल्या अंकुशचा मृतदेह फलटण तालुक्यातील निरा नदीत कसा आढळला? तसेच त्याच्या डोक्यावर असलेल्या जखमा संशयास्पद असल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
प्रेमाच्या आमिषाने रचला खूनाचा कट
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मृत अंकुश नरबट याने आरोपींच्या कुटुंबातील एका मुलीबाबत अत्याचार केल्याची माहिती समोर आली. तथापि, कुटुंबाने प्रतिष्ठेच्या कारणास्तव हा प्रकार उघड न करता सूड उगवण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी आरोपींनी स्त्रीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून अंकुशला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
भेटीसाठी फलटणला बोलावून १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता त्याला तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी निर्जनस्थळी नेण्यात आले.तेथे कटानुसार इतर आरोपी वेगवेगळ्या वाहनांनी पोहोचले. अंकुशला मारहाण करून जबरदस्तीने चारचाकीत बसवून पिंप्रद (ता. फलटण) येथील दुसऱ्या निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोखळी गावच्या हद्दीत निरा नदीत फेकून देण्यात आला.
गुन्हा नोंद, चार आरोपी अटकेत
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११९/२०२६ भा.न्या.सं. २०२३ चे कलम १०३(१), १४०(१), २३८, ६१, ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:
1. आविष्कार ज्ञानेश्वर भगत
2. श्रद्धा आविष्कार भगत
3. ज्ञानेश्वर भरतराव भगत
4. अर्चना ज्ञानेश्वर भगत
(सर्व रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा)
सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून उकल
सदर गुन्हा अत्यंत थंड डोक्याने रचल्याने सुरुवातीला पोलिसांकडे कोणतेही ठोस धागेदोरे नव्हते. मात्र पोलिसांनी फलटण ते दहिवडी मार्गावरील हॉटेल्स, दूध डेअरी व पेट्रोलपंप येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच आरोपी व मृतक यांच्या मोबाईल क्रमांकांची तांत्रिक माहिती मिळवून कॉल डिटेल्स व लोकेशनचा अभ्यास केला.तुटपुंज्या माहितीवरून पुराव्यांची साखळी जोडत अखेर पोलिसांनी हा खून उघडकीस आणण्यात यश मिळवले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक ज्ञानदेव पवार तसेच पोलीस अमलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी व हणमंत दडस यांनी तपासात मोलाची भूमिका बजावली.
या घटनेमुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून रचला जाणारा गुन्हेगारी कट किती धोकादायक ठरू शकतो, याचे हे धक्कादायक उदाहरण ठरले आहे.

