महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले
राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अंमलीपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला आहे. यापुढे आपल्या कार्यक्षेत्रात बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ आढळल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा कठोर इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत देत मंत्र्यांच्या निर्देशानंतर हे स्पष्ट करणारे परिपत्रकही काढण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जर अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले, तर त्या कार्यक्षेत्राच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल व त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनीही सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहेत की, त्यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने व अवैध मार्गाने विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रभावीपणे कारवाई करावी.
मंत्री झिरवाळ यांनी सह आयुक्त, सहायक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अन्न आस्थापनांची तपासणी करून, प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा व वितरण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आणि बंदीबाबतच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

