आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी अंकिताचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

फलटण प्रतिनिधी : मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यशाची शिखरे गाठणे अवघड नसते याचा प्रत्यय फलटणच्या आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थिनीने घडवून आणला आहे.

आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूल या शाळेची गुणी व कुशाग्र विद्यार्थिनी कु. अंकिता कल्याण भोसले हिने नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी – CBSE/ICSE) मध्ये राज्यस्तरीय १२वा क्रमांक पटकावून शाळेचा, पालकांचा आणि शहराचा मान अभिमानाने उंचावला आहे.

राज्यभरातून हजारो विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. तीव्र स्पर्धेत अंकिताने आपल्या बुद्धिमत्ता, सातत्यपूर्ण अभ्यास आणि एकाग्रतेच्या बळावर हे यश संपादन केले. तिच्या यशामागे पालकांचे सततचे प्रोत्साहन, शिक्षकांचे निस्वार्थ मार्गदर्शन आणि आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूल च्या गुणवत्तापूर्ण व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरणाचा मोठा वाटा आहे.

अंकिताच्या या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या डॉ. सौ. वैशाली शिंदे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून सांगितले की, “विद्यार्थ्यांना योग्य वातावरण, प्रोत्साहन आणि आत्मविश्वास दिल्यास ते कोणत्याही पातळीवर आपली छाप पाडू शकतात. अंकिताचे हे यश सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”अंकिताच्या राज्यस्तरीय गुणवत्ताप्राप्तीमुळे आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूल च्या यशकथेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले असून, संपूर्ण शाळा परिवारात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!