फलटण तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू

पहिल्या दोन दिवसांत ४० इच्छुकांकडून ५८ अर्जांची खरेदी; मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी :फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच तालुक्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, अर्ज विक्रीच्या पहिल्या दोन दिवसांत तब्बल ४० इच्छुकांकडून ५८ नामनिर्देशन अर्जांची खरेदी करण्यात आली आहे. मात्र, एवढी उत्सुकता असतानाही अद्याप एकाही उमेदवाराने प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही, अशी माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.

या निवडणुकीत फलटण तालुक्यातून ८ जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समिती गण निवडले जाणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्ष, स्थानिक आघाड्या तसेच अपक्ष उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू असली, तरी अंतिम उमेदवारीबाबत स्पष्टता नसल्याने अनेक इच्छुक सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, संभाव्य युती–आयुती, अंतर्गत गटबाजी तसेच जागावाटपाची गणिते अद्याप निश्चित झालेली नाहीत. त्यामुळे अनेक इच्छुकांनी अर्ज खरेदी करून तयारी पूर्ण ठेवली असली, तरी अंतिम निर्णयासाठी वरिष्ठ नेत्यांचे संकेत आणि स्थानिक राजकीय समीकरणे स्पष्ट होण्याची वाट पाहिली जात आहे.

काही गटांमध्ये एकापेक्षा अधिक दावेदार असल्याने पक्षांतर्गत चर्चा, बैठका आणि तडजोडी सुरू असल्याची माहिती आहे.अर्ज खरेदीचा आलेख वाढत असताना प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल न होणे, ही स्थिती निवडणुकीतील वाढत्या राजकीय चुरशीचे द्योतक मानली जात आहे. शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता असून, त्या वेळी निवडणूक प्रशासनावरही कामाचा ताण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यांमध्ये राजकीय पक्षांच्या बैठका, गुप्त चर्चांना वेग येणार असून, उमेदवारी जाहीर होताच तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फलटण तालुक्यातील ही निवडणूक स्थानिक राजकारणाची पुढील दिशा ठरवणारी ठरणार असल्याने, आगामी काही दिवसांत होणाऱ्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!