खंडाळा :- सातारा जिल्ह्यामध्ये नवनिर्वाचित मंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत झाल्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी नायगाव येथे जाऊन स्मारकाला अभिवादन केले.पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत नायगाव विकास आराखड्याला मान्यता देऊन निश्चितपणाने या पुण्यभूमीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असे स्मारक व विकास आराखड्याची उभारणी करू, असे राज्याचे नवनिर्वाचित ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याप्रसंगी नायगावच्या विकास आराखड्या बाबत पत्रकारांनी विचारले असता, नायगावच्या या पवित्र भूमीच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. काल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून येत्या 3 जानेवारी च्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नायगाव मध्ये येणार आहेत. जिल्हा परिषदेकडून आराखडा तयार आहे. या तीन तारखेनंतर मंत्रिमंडळाची जी पहिली बैठक होईल त्यामध्ये या आराखड्याला मान्यता देऊन निश्चितपणाने या पुण्यभूमीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असे स्मारक व विकास आराखड्याची उभारणी करू असे जयकुमार गोरे म्हणाले.

नामदार जयकुमार गोरे यांचे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिंदेवाडी व शिरवळ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आ. मनोज घोरपडे, आमदार सचिन कांबळे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.