महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
सातारा प्रतिनिधी – पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याची प्रायोगिक (ट्रायल) चाचणी शनिवारी (दि. 17) पासून घेण्यात येत आहे असून, त्यानंतर तब्बल आठ दिवस हा बोगदा वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. या ट्रायलसाठी संबंधित सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी ए. श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत ही चाचणी सुरू करण्यात आली आहे.
हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर पुणे–सातारा–बंगळूर मार्गावरील वाहतूक अधिक सुखकर, सुरक्षित आणि गतिमान होणार असून, वाहनचालक व प्रवाशांना नेहमी भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.खंबाटकी घाटातील तीव्र वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा प्रवासातील विलंब टाळण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्प साकारण्यात येत आहे.
सुमारे ९२६ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यापूर्वी खंबाटकी घाटातील घाटवाटेचा रस्ता पुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी एकेरी करण्यात आला होता, तर साताऱ्याहून पुण्याकडे येण्यासाठी स्वतंत्र बोगदा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. या व्यवस्थेमुळे काही वर्षे वाहतूक सुरळीत राहिली; मात्र अलीकडच्या काळात वाहनसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याने ही व्यवस्था अपुरी पडू लागली होती.
सातारा–पुणे महामार्गावर दररोज वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या पूर्वी सुमारे २२ हजार होती, ती आता ५५ हजारांहून अधिक झाली आहे. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघातांचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले होते. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन बोगदे व सहापदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले.या प्रकल्पांतर्गत वाई तालुक्यातील वेळे गावापासून हरिपूर ते खंडाळा दरम्यान ६.३ किलोमीटर लांबीचा नवीन सहापदरी रस्ता विकसित करण्यात येत आहे.
यामध्ये दोन स्वतंत्र बोगद्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येकी १६.१६ मीटर रुंद व सुमारे ९.३१ मीटर उंच असलेल्या या बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन मार्गिकांचे रस्ते तयार करण्यात आले असून, दोन्ही दिशेने एकाचवेळी वाहतूक करता येणार आहे.या अत्याधुनिक बोगद्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बोगद्याच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्ग ठेवण्यात आला असून, आपत्कालीन परिस्थितीत वापरता येईल असा स्वतंत्र आपत्कालीन रस्ताही तयार करण्यात आला आहे.
अपघात किंवा तांत्रिक अडचणींच्या वेळी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे.शनिवारी होणाऱ्या ट्रायलदरम्यान वाहतूक प्रवाह, सुरक्षितता यंत्रणा, प्रकाश व्यवस्था, वायुवीजन प्रणाली तसेच आपत्कालीन व्यवस्थेची चाचणी घेण्याकरिता सुरू करण्यात आला आहे. ही ट्रायल यशस्वी ठरल्यास लवकरच हा बोगदा पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून, पुणे–बंगळूर महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान व सुरक्षित होणार आहे.

