महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
कोळकी | प्रतिनिधी
मालोजीनगर, कोळकी फलटण येथील श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात पार पडले. हा उद्घाटन सोहळा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा सोलापूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत तसेच मिलिंद आप्पा नेवसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
उद्घाटन कार्यक्रमास परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, महिला मंडळ प्रतिनिधी, युवक तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यालयाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांच्या आरोग्य, मनोरंजन, सामाजिक सहभाग आणि मार्गदर्शनात्मक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान संघातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शालेय वह्या देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. समाजातील विविध घटकांना जोडणारा हा उपक्रम आदर्शवत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचा समाजातील अनुभव आणि योगदान अतिशय मोलाचे असल्याचे नमूद करत, अशा संघटनांमुळे सामाजिक सलोखा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचा गौरव करत, भविष्यातही संघाच्या विविध सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. नव्याने सुरू झालेल्या कार्यालयामुळे श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपक्रमांना नवी दिशा मिळेल आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कार्यालय मार्गदर्शन व आधाराचे केंद्र ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

