महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
विक्रम विठ्ठल चोरमले
फलटण – फलटण तालुक्यातील टाकळवाडे येथील सहकारी सोसायटीतून शेतकऱ्यांना बनावट व निकृष्ट दर्जाची खते विकली जात असल्याचा प्रकार उघडकीस येणे ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे. शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत असताना, त्याच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींचे मूळ अजूनही उखडले गेलेले नाही, हीच खरी शोकांतिका आहे.
शेतकऱ्याचा पिकावरचा, जमिनीवरचा आणि व्यवस्थेवरचा विश्वास हादरवणारा हा गुन्हा आहे. बनावट खत म्हणजे थेट उत्पादनावर घाव, उत्पन्नावर घाव आणि शेवटी शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या उपजीविकेवर घाव. तरीही असे प्रकार सहकारी संस्थांच्या नावाखाली राजरोसपणे कसे सुरू राहतात, याचे उत्तर देण्याची वेळ आता प्रशासनावर आली आहे.कृषी विभागाने नमुने तपासून गुन्हा दाखल केला, हे स्वागतार्ह असले तरी ही कारवाई पुरेशी नाही.
प्रश्न असा आहे की, इतक्या काळात ही खते किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली? किती एकर जमीन या निकृष्ट खतांमुळे नापीक झाली? आणि या साखळीत खरे सूत्रधार कोण आहेत? केवळ दोन नावे पुढे करून प्रकरण संपवण्याचा डाव तर नाही ना?सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नेमकी कुठे होती? नियमित तपासण्या, गुणवत्ता नियंत्रण, परवाना नूतनीकरण हे सगळे कागदापुरतेच राहिले का, असा सवाल उपस्थित होतो.
जर कृषी विभागाला गोपनीय माहितीवरून कारवाई करावी लागत असेल, तर नियमित यंत्रणा अपयशी ठरल्याचेच ते द्योतक नाही का?या प्रकरणात फक्त गुन्हा दाखल करून चालणार नाही. दोषींना अटक, त्यांची आर्थिक साखळी उघड करणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणे आणि अशा बनावट खतविक्रीला पाठीशी घालणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
अन्यथा ‘शेतकरी हित’ हे केवळ भाषणापुरते उरेल.शेतकऱ्यांच्या जीवावर उभारलेली ही बनावट व्यवस्था मोडून काढण्याची हीच योग्य वेळ आहे. अन्यथा उद्या पुन्हा अशीच एखादी बातमी वाचायला मिळाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?

