महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी राज्य शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या त्रुटींमुळे अडकलेले लाभ पुन्हा सुरू व्हावेत, यासाठी शासनाने ई-केवायसी दुरुस्तीचे ऑनलाईन पोर्टल पुन्हा सुरू केले असून लाभार्थी महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत आवश्यक सुधारणा करता येणार आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागांत लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यावर जमा न झाल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. काही ठिकाणी महिलांनी आंदोलन व मोर्चेही काढले होते. चौकशीअंती असे लक्षात आले की, ई-केवायसी करताना कुटुंबातील सदस्य सरकारी अथवा निमसरकारी सेवेत आहेत का, निवृत्तीवेतन घेत आहेत का, अशा महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये अनेक लाभार्थी महिलांकडून चुकून चुकीचा पर्याय निवडण्यात आला होता.
परिणामी पात्र असूनही त्यांचे हप्ते थांबविण्यात आले होते.राज्य शासनाच्या माहितीनुसार, यापूर्वी लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र या प्रक्रियेत झालेल्या मानवी चुका आणि तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावर पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहिल्या.
या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत 20 जानेवारी रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पडताळणीचे आदेश दिले होते.तथापि, प्रत्यक्ष तपासणी प्रक्रियेला वेळ लागत असल्याने आणि लाभार्थी महिलांकडून ई-केवायसीमध्ये थेट ऑनलाईन दुरुस्तीची सातत्याने मागणी होत असल्याने शासनाने पुन्हा एकदा दुरुस्तीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांना आता आपली माहिती दुरुस्त करता येणार असून पात्र महिलांचे अडकलेले हप्ते मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार लाभ देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात येईल. तसेच चुकीमुळे लाभ थांबलेल्या महिलांना कोणताही अन्याय होऊ नये, याची काळजी घेतली जाईल.
दरम्यान, जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार, याकडे लाभार्थी महिलांचे विशेष लक्ष लागले आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारीच्या सुमारास जमा करण्यात आला होता. त्यामुळे जानेवारीचा हप्ता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आश्वासन पुन्हा चर्चेत आले असून महिलांमध्ये या निर्णयाबाबत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
सध्या तरी ई-केवायसी दुरुस्तीची ही संधी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, वेळेत दुरुस्ती करून लाभ कायम ठेवावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

