आजपासून जमीन मोजणी प्रक्रियेत मोठा बदल, जमीन मोजणी कालावधी निश्चित

मुंबई:- जमीन मोजणीच्या प्रकार आणि मोजणी फी मध्ये काल सुसंगतता यावी आणि मोजणीच्या प्रकारामुळे निर्माण होणार संभ्रम व वाढता प्रशासकीय खर्च पाहता जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक कार्यालयाच्या वतीने मोजणी प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.आज १ डिसेंबरपासूनच याचे नवे दर लागू होत आहे. नियमीत आणि दूतगती, अशा दोन प्रकारांमध्ये जमीन मोजणी करण्याचा कालावधीही निश्चित करण्यात आला आहे.

आता नियमित आणि दूतगती, अशा दोन प्रकारांत जमिनीची मोजणी करण्यात येणार असून, साधी, तातडी, अतितातडी आणि अतिअतितातडीच्या जमीन मोजणीचा प्रकार आता निकाली निघाला आहे. जमिनी मोजणीची फी व दर बदलेले असले तरी १ डिसेंबर पूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांना जुन्याच पद्धतीने आकारणी होईल.१ डिसेंबरनंतर अर्ज करणाऱ्यांना नवीन दराने आकारणी केली जाईल, असेही भूमी अभिलेख कार्यालयातील सूत्रांनी सांगितले असून त्यासंदर्भातील पुणे येथील जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीनेही २५ नोव्हेंबर रोजीच्या एका पत्रान्वये ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.वास्तविक १ नोव्हेंबरपासून हे दर लागू होणार होते. परंतु, प्रशासकीय कारणास्तव त्याची अंमलबजावणी झाली नव्हती, ती आता आज १ डिसेंबरपासून होणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

अशी राहील मोजणी फी

  • महानगर पालिका तसेच पालिका हद्दीबाहेरील क्षेत्रातील जमीन मोजणीसाठी दोन हेक्टर मर्यादिपर्यंत नियमित मोजणीसाठी दोन हजार रुपये आणि दूतगती मोजणीसाठी आठ हजार रुपये फी आकारली जाईल. दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी अर्थात उर्वरित क्षेत्रासाठी अनुक्रमे एक हजार आणि चार हजार रुपये प्रमाणे आकरणी केली जाईल.
  • यासोबतच मनपा आणि पालिका हद्दीमधील क्षेत्रात एक हेक्टरचे मर्यादित तीन हजार रुपये दूतगतीसाठी १२ हजार रुपये आणि एक हेक्टर मर्यादापेक्षा अधिक क्षेत्रासाठी दीड हजार रुपये आणि दूतगतीसाठी ६ हजार रुपये असा दर राहील. कंपन्या, इतर संस्था, महामंडळे, भूसंपादन संयुक्त मोजणीसाठीचेही दर निश्चित केले गेले आहेत.

असा लागेल कालावधी

नियमीत मोजणीसाठी किमान २० दिवसांचा कालावधी अर्ज केल्यापासून गृहीत धरण्यात येणार आहे, तर दूतगती मोजणीसाठी कमाल ३० दिवसांचा कालावधी यापुढे रहाणार आहे.

error: Content is protected !!