सातारा:- बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा तमिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांना फटका बसला असून कमी दाबाचा पट्टा आता वायव्येकडे सरकत आहे. परिणामी महाराष्ट्रात पुढील ३ दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आल्या आहे.बुधवारी ४ डिसेंबरला सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात सध्या तापमान घसरल्याचं दिसत असताना आता चक्रीवादळामुळे गारठा कमी होऊन ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३ व ४ डिसेंबरदरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज IMD नं वर्तवलाय.
कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
भारतीय हवामान केंद्राच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, तळ कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील ३ दिवस हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं सांगण्यात येत आहे.
मंगळवार ३ डिसेंबरला तळकोकणातील सिंधूदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून बुधवारी ४ डिसेंबरला सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सोलापूर, सांगली, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर नांदेड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.