महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण : फलटण शहरात यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार असून शहरातील विविध महादेव मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. प्रमुख मंदिरांनी भाविकांसाठी विशेष पूजा-अर्चा व कार्यक्रमांचे आयोजन जाहीर केले आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे माळजाई मंदिर येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व शिवभक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी केले आहे.
श्री जबरेश्वर मंदिर येथे सकाळी अभिषेक व महापूजेचे आयोजन करण्यात आले असून सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार पेठेतील ऐतिहासिक श्री माणकेश्वर महादेव मंदिर येथे मुख्य उत्सव रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. पहाटे ५ ते ७ या वेळेत ‘लघुरुद्र महाअभिषेक’ होणार असून दुपारी ४ ते ५:३० या वेळेत दादामहाराज महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७:३० वाजता महाआरती, त्यानंतर ‘शिवरुद्र ढोल-ताशा ध्वज पथक’ यांचे वादन आणि रात्री ९:३० वाजता एकतारी भजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.याशिवाय श्री नागेश्वर मंदिर तसेच शहरातील इतर महादेव मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
फलटण शहर व परिसरातील सर्व शिवभक्तांनी या मंगल सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

