महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी : भगवान महावीर जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरातील मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी वाढू लागली होती. शोभायात्रा, प्रभातफेरी, सामूहिक प्रार्थना तसेच जैन धर्मग्रंथ वाचन अशा उपक्रमांनी शहर धार्मिक रंगात न्हाऊन निघाले.याच औचित्य साधून फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील तसेच फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी येथील महावीर स्तंभास भेट देत भगवान महावीरांना विनम्र अभिवादन केले.
महावीर स्तंभ येथे आमदार पाटील व नगराध्यक्ष नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले आणि शहरवासीयांना महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी जैन समाज बांधव, स्थानिक मान्यवर, समाजसेवी संस्था व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर असून त्यांचा जन्म इ.स.पू. ५९९ मध्ये वैशाली येथे झाला. त्यांनी राजवैभवाचा त्याग करून कठोर तपश्चर्या केली आणि अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रह्मचर्य या पंचमहाव्रतांचा उपदेश दिला. “जगा आणि जगू द्या” हा त्यांचा सार्वत्रिक संदेश आजच्या काळातही समाजासाठी प्रेरणादायी ठरतो.समाजात शांतता, सहिष्णुता व करुणा या मूल्यांची जपणूक करण्यासाठी भगवान महावीरांनी दिलेला संदेश अत्यंत महत्त्वाचा असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
अशा उत्सवांमुळे त्यांच्या विचारांचा प्रसार होत राहून समाजात सुसंवाद व सौहार्द वाढण्यास मदत होते, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

