वीज कर्मचारी संपावर, सणासुदीच्या काळात फलटण तालुक्यातील वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी: ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. महावितरणच्या सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संपाचा निर्णय कायम ठेवला असल्याने ऐन सणासुदीच्या काळात फलटण तालुक्यातील वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसावर दिवाळी सण असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संपाचा निर्णय कायम ठेवला आहे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमधील कामांच्या खाजगीकरणा विरोधात ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फलटण महावितरण विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या संपात सहभागी आहेत .

महावितरणचे ३२९ उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने देण्याचा, तसेच महापारेषणमधील २०० कोटी रुपयांवरील प्रकल्प टीबीसीबी माध्यमातून भांडवलदारांना देण्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या संपामुळे राज्यातील वीज वितरण विस्कळीत होण्याची शक्यता असून सणासुदीच्या काळात तालुक्यातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.सात कर्मचारी संघटनांनी खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात संपाची हाक दिली आहे. व्यवस्थापनाने ६ ऑक्टोबरला अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या उपस्थितीत चर्चा केली. खासगीकरण होणार नसल्याची ग्वाही देऊनही संयुक्त कृती समितीने संप कायम ठेवला आहे.

फलटण तालुक्यात संपामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास घरगुती, शेती, उद्योग आणि रुग्णालयांना त्रास होऊ शकतो. पाणीपुरवठा पंप आणि आपत्कालीन सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!