महसूल विभागाच्या “सेवा पंधरवडा” अभियानाचा राजाळे येथे शुभारंभ

फलटण प्रतिनिधी: महसूल विभागाच्या “सेवा पंधरवडा” अभियानाचा शुभारंभ आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत राजाळे येथे सकाळी १०.३० वाजता होणार असून “सेवा पंधरवडा” अभियानात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.

“सेवा पंधरवडा” अभियानात प्रथम टप्प्यात शिवरस्ते, पाणंद रस्ते यांचे सीमांकन घेऊन नकाशावर नोंदी करणे तसेच रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात “सर्वांसाठी घरे” योजने अंतर्गत पात्र लाभार्थीना जागांचे पट्टे नियमानुसार वाटप करण्यात येणार आहेत. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत पुनर्वसन अंतर्गत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, तिसऱ्या टप्यात पोटखराब क्षेत्राचे लागवडीलायक क्षेत्रात रुपांतर करणे, एकाच गावत एकाच नावाच्या अधिक व्यक्ती असल्यास नावामध्ये आईचे नाव किंवा टोपणनाव वाढविणे तसेच आपले सरकार केंद्र व स्वस्त धान्य दुकानांचे नागरिकांमार्फत क्यूआर कोड मुल्यांकन करणे असे विविध उपक्रम तालुक्यात राबविण्यात येणार आहेत. दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते दिनांक १९ सप्टेबर २०२५ पर्यंत विशेष ग्रामसभा आयोजीत करुन ग्रामसभेची मान्यता घेतला जाणार आहे.

त्यातूनही विवादग्रस्त अथवा अतिक्रमणग्रस्त राहिलेल्या स्त्यांबाबत तहसिलदार यांचे स्तरावर रस्ता अदालत आयोजित करून सामोपचाराने कार्यवाही करण्यात येणार आहे. यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सदर सर्व रस्त्यांचे सीमांकन करुन सर्व रस्ते नकाशात दर्शवून अभिलेखात त्यांची नोंद घेण्यात येणार आहे. तसेच याबाबत स्थानिक स्तरावर सर्व लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.

या योजनेच्या दुस-या टप्यात दिनांक २२/०९/२०२५ ते ३०/०९/२०२५ दरम्यान “सर्वांसाठी घरे” योजने अंतर्गत ग्रामविकास विभागाने सर्वेक्षण करुन अंतिम केलेल्या व शासकीय नियमाप्रमाणे पात्र असलेल्या व्यक्तींना शासकीय जागेचे पट्टे दिले जाणार असून पात्र व्यक्तींचे २०० चौ.फु. पर्यंत अतिक्रमण विहित अटीशर्ती मान्य असल्यास नियमानुकूल केले जाणार आहे. याचा लाभ भूमिहीन अथवा बेघर लोकांना होणार आहे. या दोन्ही टप्यांमध्ये ई पिक पाहणी जनजागृती व अॅग्रीस्टॅक नोंदणी देखील केली जाणार आहे. तसेच भटक्या विमुक्त समाजास व कातकरी समाजास विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करणेत येणार आहे.

आमदार सचिन पाटील यांनी या अभियानामध्ये महसूल विभागाच्या सर्व सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देत अॅग्रीस्टॅक नोंदणी, छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान, वारसनोंदी अद्यावत करणे तसेच जिवंत ७/१२ उपक्रमासाठी एकूमँ, अ.पा.क नोंदी कमी करणे लक्ष्मी मुक्ती योजना राबविण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या अनुषंगाने संपूर्ण तालुक्यात “सेवा पंधरवडा” साजरा केला जाणार आहे.

error: Content is protected !!