फलटण – फलटण तालुक्यात नाईकबोमवाडी येथे नव्याने होत असलेल्या औद्योगिक वसाहती मध्ये नवीन उद्योग आणण्याच्या दृष्टीने मंत्रालयात उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
उद्योग मंत्रालय, मुंबई येथे नाईकबोमवाडी एमआयडीसी बाबतची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. लवकरच तालुक्यातील 20,000 तरुण बेरोजगार व स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारा मोठा उद्योग उभारण्यात येणार आहे. या बैठकीत अशा मोठ्या उद्योजकांशी बोलणे करून त्यांना फलटण येथे उद्योग सुरु करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यांनीही संमती दर्शवत लवकरच नाईकबोमवाडी येथे नवीन प्रकल्प सुरू करत असल्याचे स्पष्ट केले.
आज पर्यंत करत असलेल्या पाठपुराव्यास आज यश प्राप्त झाले. या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, उद्योग मंत्रालय अधिकारी, एमआयडीसी चे अधिकारी, धनंजय साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.