मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास चोरट्याने चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला होता. सैफवर 6 वार करण्यात आले आहेत. हात, मान आणि पाठीच्या मणक्यात वार झाले आहेत.

माहितीनुसार सैफवर वार करणाऱ्या चोराचं सैफच्या मोलकरणीसोबत भांडण झालं. सैफ तिला वाचवण्यासाठी पुढे आला आणि चोरट्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोर कोण होतं हे अद्याप समजू शकलं नाही? चाकू हल्ल्यात सैफ अली खान याला दुखापत झाली असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात तपास पोलिसांनी सुरू केला असून मुंबई क्राइम ब्रँचही सैफच्या घरी जाऊन तपास करणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, या प्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून अज्ञात चोराला पकडण्यासाठी पोलीस पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

सैफ अली खान याला गुरुवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. त्याला सहा ठिकाणी जखमा झाल्या असून त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. यातील एक जखम मणक्याच्या जवळ आहे. त्याच्यावर न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन, भूलतज्ञ निशा गांधी यांच्याकडून शस्त्रक्रिया करण्यात येत आहे, अशी माहिती लीलावती रुग्णालयाचे सीईओ निरज उत्तमानी यांनी दिली. सैफ अली खान याला कोणतीही धमकी मिळाली नव्हती. त्यामुळे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसही संभ्रमात आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरू केला आहे.