
मुंबई (महेश जाधव) : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुंबई येथील पावनगड निवासस्थानी सोमवारी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे नेतृत्व म्हणून राज्याला परिचित असलेले लोकनेते बाळासाहेब देसाई यांची ११५ वी जयंती सोमवारी दौलतनगर-मरळी प्रमाणेच मुंबई येथेही उत्साहात साजरी करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरिता मुंबई मुक्कामी असलेल्या पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या पावनगड निवासस्थानी सोमवारी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
स्व. लोकनेते साहेबांनी घालून दिलेला उत्तुंग कार्याचा आदर्श आम्हास सदैव प्रेरणादायी आहे. त्या प्रेरणेतूनच पाटण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच स्व. लोकनेते साहेबांनी दिलेला जनसेवेचा वारसा आम्ही पुढे नेऊ, असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केला.पावनगड निवासस्थानी आयोजित स्व. लोकनेते साहेबांच्या जयंती सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री चंद्रकांत पाटील, दादा भुसे, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, मंगलप्रभात लोढा, संजय राठोड, अतुल सावे, तसेच आमदार सुहास बाबर, डॉ. राहुल आवाडे, आमशा पाडवी, रमेश बोरनारे आदींनी उपस्थित राहात स्व. लोकनेते साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार-संपादक मधुकर भावे यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच पर्यटन विभाग व अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह पाटण विधानसभा मतदारसंघ, सातारा जिल्हा व राज्याच्या विविध भागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.