महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण : विक्रम विठ्ठल चोरमले
फलटण नगर परिषदेतील तब्बल तीस वर्षांच्या राजे गटाच्या सत्तेला सुरुंग लावत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे माजी सभापती व महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांची सत्ता उलथवून लावत सलग आठव्यांदा नगर परिषद ताब्यात घेण्याचे राजे गटाचे स्वप्न भंग केले असून महत्वपूर्ण लढतीत समशेरसिंह नाईक निंबाळकर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदी निवड झाली आहे.
फलटण नगर परिषदेची निवडणूक ही राजेगटा साठी अस्तित्वाची व महत्वपूर्ण अशी लढाई होती कारण एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजे गटाचे तीन वेळा आमदार असणारे दीपक चव्हाण यांचा दारुण पराभव रणजितसिंह यांचे निकटवर्तीय सचिन पाटील यांनी केला. यानंतर रामराजे यांनी गट सावरण्याचा चांगला प्रयत्न केला. राजे गट पराभूत होण्यास अनेक कारणे असून त्यापैकी एक कारण म्हणजे एक एक निष्ठावंत त्यांना सोडून रणजितसिंह यांच्या बाजूने गेल्याने अचानक नवीन तरुण कार्यकर्त्यांवर जबाबदारी पडली. राजे गटातील नेते मंडळीच्या जवळ असणारे टोळक्याकडून सतत होणारी अपमानास्पद वागणूक अनेकांच्या मनाला लागली होती.
राजे गटाच्या नेत्यांचे कान भरून अनेकाना नाराज केल्याचा आरोप निष्ठावंत कार्यकर्त्याकडून होत होता. येणाऱ्या काळात राजे गटाला नगर परिषद निवडणुकीत पराभूत करण्यास कारणीभूत ठरणाऱ्याना बाजूला करावे लागणार आहे.रामराजे यांनी आपले सगळे राजकीय कसब पणाला लावून पुत्र अनिकेतराजे यांना नगराध्यक्ष पदी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला परंतू तीस वर्षांच्या सत्तेला जनतेचा अंतर्विरोध होता. सतत ज्या कार्यकर्त्यांना कमी लेखून अंतर ठेवण्यात आले हेच अंतर राजे गटाला विजयापासून दूर ठेवण्यास कारणीभूत ठरले.
खासदार गटाकडून यावेळी निवडणुकीमध्ये टीमवर्क कमी पडल्याची बाब निदर्शनाने दिसून येत होती. हीच बाब नगर परिषदेच्या उच्चांकी आकड्यापर्यंत जाऊन पोहचू शकली नाही. मागील अनेक निवडणुकीमध्ये राजे गटाला पराभव पदरी पडूनही राजे गटाकडून म्हणावे असे आत्मपरीक्षण होत नसल्याने राजे गट सतत विजयापासून दुरावत आहे.नगर परिषदेमध्ये पंधरा वर्षे कामकाजाचा दांडगा अनुभव असलेले पण नगराध्यक्ष पदापासून यापूर्वी दूर राहिलेले समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना यंदाच्या निवडणुकीत मिळालेली नगराध्यक्ष पदाची संधी ही महत्वपूर्ण होती.
नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी मिळवण्या पासून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निकालापर्यंत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची लढाई महत्त्वपूर्ण ठरली. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विरोधकांकडून अनेक अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप खासदार गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत होता. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या निवडणुकीमध्ये चोखपणे प्रचार यंत्रणा राबवून विजय खेचून आणला. त्यांचा मनमिळावू स्वभाव हा त्यांना या निवडणुकीत विजयाकडे घेऊन गेला.
फलटण नगर परिषदेत राजे गटाचा झालेला पराभव खासदार गटाचे वर्चस्व सिद्ध करणारा ठरला असला तरी कमी फरकाने मिळालेला विजय खासदार गटासाठी आकड्यांचे विश्लेषण करायला लावणारा आहे. खूप संघर्ष करून मिळवलेली सत्ता चालवताना जनतेच्या डोंगरा एवढ्या अपेक्षा पूर्ण करताना नवे नगराध्यक्ष समशेरसिंह यांचा कस लागणार आहे. पुढील पाच वर्ष फलटण नगरपरिषदेत ठप्प झालेली विकास कामे मार्गी लावण्यात खासदार गटाचा कस लागणार आहे. फलटणच्या नागरिकांना विकासाचे दाखवलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना पुढील पाच वर्षाचे विकासाचे मायक्रो प्लॅनिंग करावे लागणार आहे.
फलटण परिषदेवर गेली चार वर्षे प्रशासक राज होते या काळात फलटणच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झाले त्यात राजे गटाच्या तब्बल तीस वर्षांच्या सत्तेला जनतेने सपशेल नाकारले असून अनेक नव्या चेहऱ्यांना या निवडणुकीत मतदारांनी संधी दिली आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या अनेक नगरसेवक उमेदवारांना जनतेने नाकारले असून या निवडणुकीत जनतेकडून मिळालेला प्रतिसाद पाहता खासदार गटाला विजयाने हुरळून न जाता कमी झालेल्या मतदानाचा विचार करावा लागणार आहे.
राजे गटाकडून झालेल्या चुका या खासदार गटाकडून पुनरावृत्तीद्वारे होत असल्याची चर्चा या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली असून माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर याकडे कसे पाहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फलटण नगर परिषद अध्यक्षपद :
नाव : समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर पक्ष : भाजपा
प्रभाग क्र 1 अ अस्मिता भिमराव लोंढे(अपक्ष)
प्रभाग क्र 1 ब सोमा गंगाराम जाधव (अपक्ष)
प्रभाग क्र 2 अ मीना जीवन काकडे (राष्ट्रवादी अजित पवार )
प्रभाग क्र 2 ब सुपर्णा सनी अहिवळे (राष्ट्रवादी अजित पवार )
प्रभाग क्र 3 अ सचिन रमेश अहिवळे (राष्ट्रवादी अजित पवार )
प्रभाग क्र 3 ब सुलक्षणा जितेंद्र सरगर (भाजपा)
प्रभाग क्र 4 अ रूपाली सूरज जाधव (शिवसेना)
प्रभाग क्र 4 ब अजरुद्दीन ताजुडीन शेख (शिवसेना)
प्रभाग क्र 5 अ कांचन दत्तराज व्हटकर (भाजपा)
प्रभाग क्र 5 ब रोहित राजेंद्र नागटिळे (भाजपा)
प्रभाग क्र 6 अ किरण देवदास राऊत (भाजपा)
प्रभाग क्र 6 ब मंगलादेवी पृथ्वीराज ना निंबाळकर (भाजपा)
प्रभाग क्र 7 अ स्वाती राजेंद्र भोसले (भाजपा)
प्रभाग क्र 7 ब पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे (शिवसेना)
प्रभाग क्र 8 अ विशाल उदय तेली (शिवसेना)
प्रभाग क्र 8 ब सिध्दाली अनुप शहा (भाजपा)
प्रभाग क्र 9 अ कविता श्रीराम मदने ( कृष्णा भीमा आघाडी )
प्रभाग क्र 9 ब पंकज चंद्रकांत पवार (काँग्रेस )
प्रभाग क्र 10 अ श्वेता किशोर ताराळकर (शिवसेना)
प्रभाग क्र 10 ब अमित अशोक भोईटे (भाजपा)
प्रभाग क्र 11 अ संदीप दौलतराव चोरमले (भाजपा)
प्रभाग क्र 11 ब प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले (भाजपा)
प्रभाग क्र 12 अ विकास वसंतराव काकडे(शिवसेना)
प्रभाग क्र 12 ब स्मिता संगम शहा (शिवसेना)
प्रभाग क्र 13 अ मोहिनी मंगेश हेंद्रे (भाजपा)
प्रभाग क्र 13 ब रूपाली अमोल सस्ते (भाजपा)
प्रभाग क्र 13 क राहूल अशोक निंबाळकर (राष्ट्रवादी अजित पवार )

