मोठी बातमी ! ३ डिसेंबरला होणारी मतमोजणीही लांबणीवर,आता २१ डिसेंबरलाच मतमोजणी, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

विक्रम विठ्ठल चोरमले

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या २४ नगराध्यक्ष आणि १५४ जागांवरील निवडणूक स्थगित केली होती. आयोगाच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये आज होत असलेल्या मतदानाचा निकालही पुढे ढकलण्याची मागणी हायकोर्टाने मान्य केली आहे.

नागपूर खंडपीठात आज मतमोजणीबाबत पुढे ढकलण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली असता आज सुरू असलेल्या निवडणुकांसाठीच्या मतदानाची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती. पण हायकोर्टाने २१ डिसेंबरलाच सर्व मतमोजणी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. आयोगाच्या सुधारित कार्य़क्रमानुसार २४ अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या १५४ सदस्यपदाच्या जागांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर २१ डिसेंबरला मतमोजणी आहे.

आता २१ डिसेंबरलाच राज्यातील सर्व २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. याचबरोबर २० डिसेंबरनंतरच एक्झिट पोलही प्रसिध्द करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय २३ नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर आल्याने संबंधित ठिकाणी सुधारित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अध्यक्षपदासंदर्भातील अपिलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारीत कार्यक्रमानुसार राबविली जाईल. अध्यक्षपदासोबतच सदस्यपदांची एकत्रित निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. ज्या ठिकाणच्या सदस्यपदासाठी अपील होते, तिथे मात्र फक्त त्या जागेपुरताच सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविला जाईल.

अपील कालावधीनंतरच्या टप्प्यांसाठीच्या सुधारित कार्यक्रमानुसार आता १० डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप ११ डिसेंबरला होईल. ता. २० डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २१ डिसेंबरला सकाळी १० वाजता सुरू होईल.

अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे : ठाणे- अंबरनाथ. अहिल्यानगर- कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी व नेवासा, पुणे- बारामती व फुरसुंगी उरुळी देवाची, सोलापूर- अनगर व मंगळवेढा, सातारा- महाबळेश्वर व फलटण, छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री, नांदेड- मुखेड व धर्माबाद, लातूर- निलंगा व रेणापूर, हिंगोली- वसमत, अमरावती – अंजनगाव सूर्जी, अकोला- बाळापूर, यवतमाळ- यवतमाळ, वाशीम- वाशीम, बुलढाणा- देऊळगाव राजा, वर्धा- देवळी, चंद्रपूर- घुग्घूस.

सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांची यादी :

अमरावतीः अचलपूर-२, दर्यापूर-१, धारणी-२ व वरूड-१. अहिल्यानगरः जामखेड-२, राहुरी-१, शिर्डी-१, शेवगाव-३, श्रीगोंदा-१, श्रीरामपूर-१ व संगमनेर-३. कोल्हापूरः गडहिंग्लज-१. गडचिरोलीः आरमोरी-१ व गडचिरोली-३. गोंदियाः गोंदिया-३ तिरोडा-१. चंद्रपूरः गडचांदूर-१, बल्लारपूर-१, मूल-१ व वरोरा-१. छत्रपती संभाजीनगरः गंगापूर-२, पैठण-४ व वैजापूर-२. जळगावः अंमळनेर-१, पाचोरा-२, भुसावळ-३, यावल-१, वरणगाव-२ व सावदा-३. जालनाः भोकरदन-२. ठाणे: बदलापूर-६. धाराशिवः उमरगा-३ व धाराशिव-३. नांदेडः कुंडलवाडी-१, भोकर-१ व लोहा-१. नागपूरः कामठी-३, कोंढाळी-२, नरखेड-३ व रामटेक-१. नाशिकः ओझर-२, चांदवड-१ व सिन्नर-४. परभणीः जिंतूर-१ व पुर्णा-२. पालघरः पालघर-१ व वाडा-१. पुणेः तळेगाव-६, दौंड-१, लोणावळा-२ व सासवड-१. बीडः अंबेजोगाई-४, किल्ले धारूर-१ व परळी-५. बुलढाणाः खामगाव-४, जळगाव जामोद-३ व शेगाव-२. भंडाराः भंडारा-२. यवतमाळः दिग्रस-३, पांढरकवडा-२ व वणी-१. रत्नागिरीः रत्नागिरी-२. लातूरः उद्‌गीर-३. वर्धाः पुलगाव-२, वर्धा-२ व हिंगणघाट-३. वाशीमः रिसोड-२. सांगलीः शिराळा-१. सातारा: कराड-१ व मलकापूर-२. सोलापूरः पंढरपूर-२. बार्शी-१, मैंदर्गी-१, मोहोळ-२ व सांगोला-२ आणि हिंगोली: हिंगोली-२.

error: Content is protected !!