महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण – फलटण तालुक्यातील नांदल गावात राजकीय हालचालींना वेग आला असून, येथील शंकर गुलदगड,दादा गुलदगड, मारुती यादव, कोंडीबा तरडे, महादेव साळुंखे, वसंत मोहिते, संपत जगदाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राजे गटातून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे नांदलसह परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याचे चित्र आहे.हा प्रवेश कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजप फलटण तालुका मंडल अध्यक्ष विकास ऊर्फ बापूराव शिंदे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करत भाजपची विचारधारा, विकासाभिमुख धोरणे आणि संघटनात्मक बांधिलकी यांची माहिती दिली.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. भाजप ही केवळ पक्ष नसून विकासाची चळवळ आहे. नांदलमधील कार्यकर्त्यांचा प्रवेश हा भाजपसाठी निश्चितच बळकटी देणारा आहे.”प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही भाजपच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
गावागावात विकासकामे, केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला भाजपचे तालुका व मंडल स्तरावरील पदाधिकारी, बूथ प्रमुख, ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच नांदल व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशानंतर कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘भाजप जिंदाबाद’च्या घोषणा देत उत्साह व्यक्त केला.
या राजकीय प्रवेशामुळे फलटण तालुक्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत होणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

