ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- काळगाव विभागातील डोंगरकपारीत वसलेल्या लोहारवाडी ता.पाटण वस्तीमध्ये असलेले विद्युत पोल तळातच गंजलेले असून ते कधी कोसळतील हे सांगता येत नसल्याने येथील लोक भीतीच्या छायेत वास्तव्य करताना दिसत आहेत. महावितरण विभाग हा दुरुस्ती देखभालीकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांच्या मध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाले आहे.

लोहारवाडी ता.पाटण वस्तीमध्ये असलेले विद्युत पोल गांजलेल्या अवस्थेत असल्याने ही धोकादायक परिस्थिती लोकांच्यासाठी डोक्यावर टांगती तलवार बनली आहे. अनेक वर्षापूर्वी बसविण्यात आलेले विद्युत पोल निकामी झाले आहेत हे पोल लोखंडी असल्याने त्याला गंज लागून कुमकुवत झाले आहेत. याबाबत महावितरण विभागाला याची माहिती दिली असल्याचे सांगितले जात आहे मात्र याकडे गांभिर्याने घेतले जात नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यावरच संबधितांचे डोळे उघडणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोहारवाडी हे गाव डोंगर कपारीत असलेली वस्ती असल्याने या ठिकाणचे पोल सध्या धोकादायक बनले आहेत. ते बदलण्याची गरज आहे. काही पोल भर वस्तीत असल्याने ते गंजून जीर्ण झाल्याने पोल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. महावितरण विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

