
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ढेबेवाडी च्या बाजारतळावर व्यापाऱ्यांना कट्टे बांधून दिले परंतु गेल्या वर्ष भरापासुन हे व्यापारी कट्टे फक्त शोपिस बनले आहेत. येथील व्यापारी बाजारतळावरील कट्ट्यावर न बसता झेंडा चौक येथील रस्त्याच्या दोन्ही बाजुला बसून भाजिपाला विकत असल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. या कट्ट्यांचा विक्रेते उपयोग करत नसल्याने या कट्ट्याची अवस्था म्हणजे असुन अडचण आणि नसुन खोळंबा अशीच झाली आहे.

सध्या ढेबेवाडी बाजारपेठेत दररोज बाजार भरत आहे त्यामुळे येथील लोकांची गर्दी रस्त्यावर ओसंडून वाहात आहे. येथे मोठा बाजारतळ आहे परंतु व्यापारी या बाजारतळावर न बसता बाजारपेठेच्या तोंडावर मुख्य रस्त्याच्या कडेला बाजार मांडून बसतात त्यामुळे बाजारतळावर असलेल्या शासकीय गोदामाच्या अवजड वाहनांना , दुचाकीस्वरांना तसेच पादचारी नागरीकांना बाजारपेठेतुन ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते ही बाब लक्षात घेवून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी येथील व्यापाऱ्यांच्या मागणी वरुन बाजारतळावर कट्टे बांधण्यासाठी खासदार फंडातून दहा लाख रुपयांचा निधी दिला आणि प्रशस्त व्यापारी कट्टे बांधले परंतु गेले वर्ष भरापासुन या कट्ट्याकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. रस्त्यावर मालाची विक्री करत बसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.