ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- ढेबेवाडी ता.पाटण येथील आसपासच्या वाड्या वस्तीवर गेले अनेक दिवसांपासून वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत.
ढेबेवाडी या परीसरातील काही गांवाचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये करण्यात आलेला आहे. चोरगेवाडी ता.पाटण येथे काही दिवसापुर्वी दोन शेळ्या व दोन कुत्री तर उत्तम बाबु चोरगे यांच्या गोठ्यात बांधलेली गाईवर बिबट्याने हल्ला करुन गाईला देखील ठार मारले. यामुळे चोरगेवाडीतील शेतकरी भीतीच्या छायेत वास्तव्य करताना दिसत आहेत.
येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन आहे.वनविभागाने मनुष्याला जंगलात प्रवेशापासून रोखले. मात्र वन्यप्राण्यांना लागणारी अन्न साखळी निर्माण न केल्याने प्राण्यांना मात्र जंगलातून बाहेर येण्यापासून रोखण्यात त्यांना अपयश आले. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. बिबट्याच्या दहशतीमुळे दिवसा देखील बाहेर पडने मुश्कील झाले आहे.
शेती करायची तरी कशी ? असा प्रश्न शेतकऱ्यांला पडतोय. बिबट्याच्या हल्यात पशुधन नष्ट होत आहे.तसेच डुकरांचे , गव्यांचे ,वानरांचे कळपच्या कळप शेतात घुसुन शेतीचे नासधूस करत आहेत .हाता तोंडाशी आलेली पीके मातीमोल होत आहेत .त्यामुळे काही शेतकऱ्यांनी तर आपली शेती पडीकच ठेवली आहे.आम्ही वनविभागाच्या जंगलात गेलो तर आम्हाला गोळ्या घाला आणि आमच्या शेतात, मानवी वस्तीत वन्यप्राणी आला तर आम्हाला त्याला मारायची परवानगी द्या, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.
त्यामुळे मत्रेवाडी, निवी, घोटील , सलतेवाडी, या सारख्या गावातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या भीतीच्या छायेत आपले जीवन जगत आहेत. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी हा परीसर निसर्गसंपन्न असा आहे. सध्या वन्यप्राणी आपल्या जीवन अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. हा संघर्ष सध्या सीमित आहे, तो आणखी वाढला तर त्याचा धोका ग्रामस्थांना अधिक आहे.
जंगलात गवा, वाघ, बिबट्या, मोर आणि डुक्कर व इतर वन्यजीव जगले पाहिजेत, म्हणून त्याची अन्न साखळी तयार केली पाहिजे.तरच वन्यजीव अन् माणूस संघर्ष कमी होईल मात्र त्यांना जगविणाऱ्या अन्न साखळीकडे लक्ष न दिल्याने हे वन्यजीव मानवी वस्तीकडे येताना दिसत आहेत. पर्यावरणप्रेमींनी वन्यजीव जगला पाहिजे, असा विचार करताना तेथील शेतकरी, माणूस जगला पाहिजे असा ही विचार होणे गरजेचे आहे.
वन्यप्राण्यांच्या दहशतीने अनेक शेतकऱ्यांनी शेती न करताता शहराकडे धाव घेतली आहे.गावाकडील शेतकरी जर शहराकडे स्थलांतर झाले तर अनेक गावे व गावातील बाजारपेटा ओस पडतील.वनविभागाने जंगली प्राण्याचा बंदोबस्त करावा. यावर विचारविनिमय होणे गरजेचे आहे.
दिपक चोरगे, शेतकरी