ढेबेवाडी प्रतिनिधी – महेश जाधव :- गेल्या अनेक वर्षापासून ढेबेवाडी ता.पाटण येथील बस स्थानक परिसरात अतिक्रमण भोकाळले होते. बुधवारी पाटण बांधकाम विभागाने रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केल्याने ढेबेवाडी बस स्थानक परिसरातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
वाहतुकीस अडथळे ठरणारे अतिक्रमण ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण धाईगडे यांच्या सहकार्याने पोलीस बंदोबस्तासह काढण्यात आले.अतिक्रमण हटवण्याबाबत संबंधित विभागामार्फत सर्व दुकानदारांना दोन महिन्यापूर्वी नोटीस देखील देण्यात आली होती. पाटण तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ढेबेवाडी बाजार पेठेचे नावलौकीक आहे परंतु या बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वारावर खाजगी व्यावसाईकांनी अतिक्रमण केल्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडी होत होती हातगाडी,फळविक्रेते, यासह इतर व्यावसाईक या मुख्य रस्त्यावर बसून माल विक्री करत होते त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांना अडथळा होत होता.
ही बाब बांधकाम विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर या व्यावसायिकांना सुरुवातीला नोटीस देण्यात आले होते त्या नोटीशीला दाद न दिल्याने शेवटी आज पोलिस बंदोबस्तात जी.पी.सावंत उपअभीयंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग दक्षीण पाटण याच्या अध्यक्षतेखाली स्वप्नील वागमोडे शाखा आभीयंता बांधकाम विभाग पाटण, मारुती जाधव, निरंजन कराड , सुहास पवार , उदय पाटील यांच्या सह बांधकाम विभागाने कारवाईचा बडगा उगारला आणि सर्व अतिक्रमण हटवण्यात आली.
अतिक्रमण केलेल्या या परिसरात नेहमी वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते मात्र गेले अनेक वर्षापासून कराड – ढेबेवाडी रोड आणि ढेबेवाडी पाटण रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण केले होते त्यामुळे बसस्थानक परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत होती याबाबत लोकांमध्ये कायमच दबक्या आवाजात चर्चा सुरु होती परंतु खुलेआम कोणी या बाबतीत आवाज उठवत नव्हते आज संबंधित विभागाने अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याचे धाडस दाखवून ही मोहिम अधिक कडक करुन आज सकाळी पोलीस बंदोबस्तात पानटपऱ्या काढून हा परिसर स्वच्छ केला.