
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी ते तळमावले चौपदरीकरण झालेल्या रस्त्याच्या मालदन स्टॉपनजीक पूर्व दिशेला 50 फूट अंतरावरती रस्त्यालगत असलेल्या झाडाच्या फांद्या डांबरीकरणालगत लोंबकळत आहेत. त्यामुळे दोन वाहने एकाचवेळी जात असतील तर लोंबकळणाऱ्या फांद्या वाहनास धडकत आहेत. रस्त्यावर लोंबणाऱ्या फांद्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे.
ढेबेवाडी- कराड रस्त्याचे काही वर्षांपूर्वी चौपदरीकरण करण्यात आले. या चौपदरीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आला. ढेबेवाडी कराड रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने या विभागातील विकासाचा वेग वाढला आहे. विभागातील आजूबाजूच्या गावांचे दळणवळण सुसह्य व सुरक्षित झाले आहे.
रस्ता रुंदीकरणामुळे दळणवळण सोयीचे झाले असले तरी रस्त्याच्या देखभालीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ढेबेवाडी ते तळमावले रस्त्याच्या आजूबाजूला गवताची झुडपे वाढली आहेत. या झुडपांनी रस्त्यावर आक्रमक केले आहे. साईडपट्ट्या गवतात गुडुप झाल्या आहेत. अगदी रस्त्याच्या कडेला डांबरीकरणावर सुद्धा गवताचे अतिक्रमण झाले आहे.
त्यामुळे रुंदीकरण होऊनही रस्ता अरुंद वाटू लागला आहे.तसेच या रस्त्यावर अनेक अपघात घडलेले आहेत. तर काहीचे या ठिकाणी प्राणही गेले आहेत. झाडाच्या फांद्या रस्त्यावरती लोंबत असल्यामुळे समोरून आलेल्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने हे ठिकाण अपघातास आमंत्रण देत आहे. रस्ता रुंदीकरणामध्ये येथील झाडी काही प्रमाणात हटविण्यात आली.
त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरक्षित झाली होती. मात्र येथील झाडाच्या फांद्या डांबरीकरणा पासून 5 ते 6 फुटावरच लोंबकळत असल्याने अचानक वाहनांच्या समोर रात्रीच्या वेळेला फांदी दिसता वाहन चालकाच्या काळजाचा ठोका चुकत आहे. तर अनेक वेळा वाहने या फांद्यांना घासून जात आहेत. संबंधित विभागाने अपघातापूर्वी वाहतुकीस अडथळा होणाऱ्या फांद्या काढून रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी वाहनचालक व नागरिकांच्यातून केली जात आहे.
रात्रीच्या वेळी अथवा दिवसा या ठिकाणी मोटारसायकलस्वार रस्त्याच्या कडेला गेल्यास फांद्याना धडकून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अपघातांनंतर संबंधित विभागाला जाग येणार आहे का ? या धोकादायक स्थितीत अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.
गणेश यादव, तालुकाध्यक्ष, भाजप पाटण तालुका.