तडीपार गुंड शहरात खुलेआम वावरत; शहर पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याने जिल्हा प्रशासनाने तडीपार केलेले काही गुंड पुन्हा फलटण शहरात खुलेआम वावरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फलटण शहरातून तडीपार करण्यात आलेल्या काही गुन्हेगारांना न्यायालयीन आदेशानुसार ठराविक कालावधीसाठी जिल्ह्याबाहेर राहणे बंधनकारक असते. मात्र, प्रत्यक्षात हे तडीपार गुंड शहरातच फिरताना अनेकांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे. काही जण तर भर चौकात आणि सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे वावरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तडीपार कारवाईचा उद्देश गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे आणि फलटण शहरातील शांतता कायम ठेवणे हा असतो. परंतु तडीपार केलेले गुंड पुन्हा शहरात येऊन मुक्तपणे वावरत असतील, तर अशा कारवाईचा नेमका उपयोग काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.याबाबत नागरिकांनी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शहरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, फलटण शहर पोलिसांनी अशा तडीपार आरोपींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.शहरात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी फलटण शहर पोलिस प्रशासनाने अधिक सतर्क राहून तडीपार गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!