फलटणमध्ये वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचा ऐतिहासिक प्रारंभ; न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सुवर्णपानाची भर

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण : फलटणच्या प्रशासकीय आणि न्यायालयीन वैभवात आणखी एका ऐतिहासिक सुवर्णपानाची भर पडत आहे. बहुप्रतिक्षित ‘दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर’ या न्यायालयाची प्रत्यक्ष सुरुवात येत्या रविवारी होत असून, यामुळे फलटणच्या न्यायव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण–कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील यांच्या अथक प्रयत्नातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे न्यायालय फलटणसाठी मंजूर झाले होते. आता त्याचे प्रत्यक्ष उद्घाटन होत असल्याने स्थानिक वकिलांमध्ये तसेच नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

उद्घाटन सोहळ्याची रुपरेषा

रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विमानतळाशेजारील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीत भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती नितीन आर. बोरकर यांच्या शुभहस्ते न्यायालयाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे, न्यायमूर्ती राजेश एस. पाटील, न्यायमूर्ती संजय ए. देशमुख आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तसेच सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद शं. वाघमारे हेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

नागरिक व वकिलांसाठी मोठा दिलासा

आजवर वरिष्ठ स्तरावरील दिवाणी दाव्यांसाठी फलटण व परिसरातील पक्षकारांना सातारा येथे न्यायालयात जावे लागत होते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांचा मोठा अपव्यय होत होता. आता हे न्यायालय फलटणमध्येच सुरू होत असल्याने न्याय मिळवणे अधिक सुलभ, जलद आणि सोयीचे होणार आहे. स्थानिक बार असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

फलटण जिल्हा निर्मितीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

नुकतेच फलटणला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले असून, त्यानंतर आता वरिष्ठ स्तर न्यायालयाची प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. त्यामुळे ‘फलटण जिल्हा’ निर्मितीच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. प्रशासकीय आणि न्यायालयीन यंत्रणेचा विस्तार झाल्याने फलटणचे महत्त्व राज्याच्या प्रशासकीय नकाशावर अधिक ठळक होत आहे.राजकीय, प्रशासकीय आणि न्यायिक पातळीवर फलटणच्या वाढत्या महत्त्वाची ही ठळक नोंद ठरत असून, आगामी काळात फलटण स्वतंत्र जिल्हा होण्याच्या मागणीला अधिक बळ मिळणार आहे.

error: Content is protected !!