फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ

फलटण:- फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला भारतीय राज्यघटना 1950 मधील अनुच्धेद 311(2) ब नूसार पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण येथील एका डॉक्टर महिलेने निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने चारवेळा अत्याचार केला तर इंजिनिअर बनकर याने मानसिक छळ केला असे तळहातावर लिहून 23 ऑक्टोबर रोजी फलटण येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. यानंतर फलटण पोलीसांनी दोघांना अटक केली होती.सदरचे प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत असून याबाबत सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांच्या विरोधात आरोपांच्या फेरी झाडत आहेत.

या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना फलटण पोलीसांना दोघांच्या मोबाईल मधून महत्त्वाची माहिती पोलीसांच्या हाती लागली असल्याची माहिती मिळत आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या देखरेखीखाली सुरु आहे. त्यांनी याबाबत फलटण येथील संबंधित हॉटेल व उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली तसेच फलटण शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन तपासाच्या बाबतीत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला होता.

दोन दिवसांपूर्वी सुषमाताई अंधारे यांनी फलटणमध्ये येऊन फलटण शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर संपूर्ण दिवस बसून निषेध व्यक्त केला होता. यावेळी पोलीस प्रशासन व मोर्चामधील आंदोलनकर्ते यांच्या मध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी गोपाळ बदने आणि इंजिनिअर प्रशांत बनकरला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर आता सातारा पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई करत गोपाळ बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे.

पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने बेफिकिरीने, नैतिक अध:पतन व दुर्वर्तन, विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग केल्याने तसेच समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणुक केल्याने सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी भारतीय राज्यघटना 1950 मधील अनुच्धेद 311(2) ब नूसार शासकिय सेवेतून गोपाळ बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आला असल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!