
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण:- फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेत महसूल अधिकारी व्यस्त असून उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर हे निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. दिनांक २ रोजी फलटण नगर परिषदेचे मतदान असून दिनांक ३ रोजी मतमोजणी आहे. दोन्ही महसूल अधिकारी नगर परिषद निवडणूक प्रक्रियेमध्ये व्यस्त असताना फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी कोट्यवधीचे गौण खनिज फस्त करण्याचा प्रकार सुरू आहे.
फलटण तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी २५ ते ५०० अशा कमी ब्रास ची गौण खनिजाची रीतसर परवानगी काढण्यात येत असून प्रत्यक्षात हजारो ब्रास गौणखनिज उत्खनन करून विक्री केले जात आहे. प्रत्यक्षात गौणखनिज परवानगी दिलेला गट क्रमांक व जागेवर उत्खनन केलेला गट क्रमांक यामध्ये तफावत असून दिवसाढवळ्या बेकायदेशीर गौण खनिज फस्त केले जात आहे. फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी विविध व्यवसाय तसेच घरगुती बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याकरता मोठ्या प्रमाणात मुरूम आवश्यक असतो या मुरुमाची पूर्तता करण्याकरता अनेक गौणखनिज विक्री करणारे महसूल कर्मचाऱ्याना हाताशी धरून साखळी पद्धतीने संगणमताने काम करत आहेत.
एकीकडे परवानगी करता अर्जात नमूद करण्यात आलेला गट क्रमांक व प्रत्यक्षात उत्खनन करण्यात आलेला गट क्रमांक यामध्ये तफावत असून परवानगी २५ ते ५०० ब्रासची प्रत्यक्षात हजारो ब्रास मुरूम उत्खनन करून उचलला जात आहे. तसेच वाहतूक करता दाखवण्यात आलेले वाहन क्रमांक व प्रत्यक्षात वाहतूक करताना येत असलेले वाहन क्रमांक वेगवेगळे असून परवानगी पाच ते दहा दिवसाची असताना प्रत्यक्षात मनसोक्त पणे परवानगीची मुदत संपूनही मुरमाची अवैध वाहतूक सुरू आहे.
फलटण तालुक्यातील अनेक भागात हा प्रकार सुरू असून याकडे स्थानिक महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गौणखनिज माफीया यांच्याकडून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवला जात असून हा सर्व प्रकार महसूल अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीने सुरू असल्याची तक्रार तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे.अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी अनेक तक्रारी होऊनही महसूल विभाग त्याकडे कानाडोळा करत असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.ज्या ज्या ठिकाणी हा अवैध मुरूम वापरला गेला आहे त्या त्या ठिकाणी महसूल विभागाने प्रत्यक्षात पंचनामे करणे आवश्यक असून ज्या ठिकाणी मुरुमाचा वापर केला गेला आहे. त्या ठिकाणी बांधकाम मालकाकडून बेकायदेशीर वापर करण्यात आला आहे त्याच्याकडून बुडविलेला महसूल वसूल करण्याची आवश्यकता आहे.
आज अखेर फलटण तालुक्यात या पद्धतीने कोट्यावधीच्या महसुली रकमेची चोरी अधिकारी व कर्मचारी याच्या संगणमताने करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून होत आहे.निवडणुकीच्या अनुषंगाने महसूल अधिकारी व्यस्त असल्याचे चित्र सध्या फलटण तालुक्यात असताना याचाच गैरफायदा घेऊन फलटण तालुक्यात गौण खनिज उत्खनन जोरात सुरू असून तलाठी व मंडळ अधिकारी याकडे संगणमताने दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
ज्या ठिकाणी अवैध उत्खनन आढळून येईल त्या ठिकाणी काम करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या मधून होत आहे. उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर व तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव हे याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्खनन परवानगी देण्याची जबाबदारी असणाऱ्या संबंधित कक्षाच्या कर्मचारी व ईतर अधिकारी यांचे मोबाईल सीडीआर तपासल्यास उत्खनन परवानगी अर्ज दाखल करण्यापासून ते बेकायदेशीर उत्खननापर्यंत सुरू असलेली साखळी समोर येणार असून जिल्हाधिकारी संतोष पाटील याप्रकरणी लक्ष घालून सीडीआर तपासण्याची मागणी होत आहे.

