फलटण:- महावितरण प्रशासनाने वीज ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यात याव्यात या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये अशा सूचना वारंवार दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अनेकदा या सूचनांचे उल्लंघन फलटण महावितरण विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
मुख्यालयात वास्तव्यास नसलेल्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता गोठवण्याचे आदेश असताना कारवाई कुणी करायची आणि कुणावर करायची हा प्रश्न आहे. वरिष्ठ अधिकारी ते जनमित्र मुख्यालयात वास्तव्य करत नाहीत तसेच परवानगी न घेता मुख्यालय सोडत आहेत. सलग सुट्टी आल्यास सर्व वीज यंत्रणा ठप्प होत आहे. विविध कारणांमुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असतात अनेक वीज कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याने वीज यंत्रणेत होणारा बिघाड दुरुस्त करण्यास कोणीही अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.
यापूर्वी अशा तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता महावितरण कडून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. यापूर्वी महावितरण प्रशासनाने अनेक कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता, मुख्यालयी वास्तव्यास नसल्याच्या कारणास्तव गोठविला होता आणि परिणामस्वरूप अनेकांनी मुख्यालयात वास्तव्यास सुरुवातही केली होती. यावेळी हा नियम अधिक कठोरपणे राबवून प्रत्येक कर्मचारी हा आपल्या मुख्यालयी वास्तव्यास असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश महावितरण कडून परिमंडळातील मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंता यांना दिले होते पण याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.
महावितरण कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे यासाठी कंपनी प्रशासन पूर्वीपासूनच आग्रही असून याबाबत सातत्याने पाठपुरावा करणे सुरू असतानाही अनेक कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याच्या तक्रारी येत आहेत.वीज वितरण यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीबाबत हयगय होत असून एकमेकांवर टोलवा टोलवी करण्याचा प्रकार महावितरण फलटण शहर उपविभागात सुरू असून असाच प्रकार फलटण विभागीय कार्यालय अंतर्गत सर्वत्र सुरू आहे.
महावितरण कंपनीच्या प्रकाशगड येथील अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन विनापरवानगी मुख्यालय सोडून जाणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे याबाबत जागृत नागरिकांनी थेट महावितरण कंपनीच्या प्रकाशगड येथे तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.