महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण:- फलटण तालुक्यातील नागरिकांची नवीन विजेचे कनेक्शन घेण्यासाठी मोठी धावपळ होत असून फलटण विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या महावितरण शाखा अभियंता यांच्याकडुन नवीन विज जोडणी करीता नागरिकांची हेळसांड होत आहे.
महावितरणच्या शाखा कार्यालयात घरगुती व व्यावसायिक वीज कनेक्शन कोटेशन काढण्यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे नागरिकांना वीज कनेक्शन काढताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांनी घरगुती किंवा व्यावसायिक वीज कनेक्शन जोडण्यासाठी २४ तासात वीज कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे महावितरण सांगण्यात आले असले तरी फलटण विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा कार्यालयात नागरिकांची अडवणूक होत आहे.
३० दिवस उलटूनही नागरिकांना वीज जोडणी मिळत नाही.कागदपत्रांसह अचूक अर्ज करणाऱ्या ग्राहकांना आता अवघ्या २४ तासांत कनेक्शन न देता विविध कारणास्तव अर्ज निकाली काढण्यात येत असून सिस्टीम बंद आहे, मीटर शिल्लक नाही, कागदपत्र अपूर्ण आहेत अशी विविध कारणे देत वीज जोडणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
फलटण विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या महावितरण शाखा अभियंता यांच्याकडुन अनेक खाजगी एजंट नेमण्यात आले असून आर्थिक तडजोड केल्यास लगेचच वीज जोडणी मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जाणीवूर्वक विज जोडणीस विलंब करणाऱ्या शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
अनेक महिन्यांपासून फलटण विभागीय कार्यालय अंतर्गत वीज ग्राहकांना मिळणारी वीज सेवा विस्कळीत झाली असून महावितरण ने ग्राहकांना सेवा देण्यासाठी जारी केलेले आदेश शाखा अभियंता यांच्याकडुन पायदळी तुडवले जात आहेत. लोकप्रतिनधी यांनी फलटण विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी वर्गाची मक्तेदारी मनमानी मोडीत काढून काम न करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करून चांगले काम करणारे अधिकारी नेमण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांच्यातून होत आहे.
महावितरण कडून सर्व शाखा अभियंता मोबाईल सिमकार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत परंतु अनेक शाखा अभियंता दोन ते तीन दिवस मोबाईल बंद ठेवत असल्याने नागरिकांनी वीज सेवा मिळण्यास त्रास होत आहे. एकंदरीत फलटण तालुक्यातील वीज व्यवस्था कोलमडली आहे.