फलटण नगरपरिषद अध्यक्षपद सर्वसाधारण झाल्याने नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार होणार

विक्रम विठ्ठल चोरमले

फलटण : आज सकाळी ११ वाजता मंत्रालय मुंबई येथे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमात फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पद ‘सर्वसाधारण खुला’ प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे फलटण नगर परिषदेचे अध्यक्ष सर्वसाधारण खुले झाल्याने येणाऱ्या नगरपरिषदेची निवडणूक ही फार रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फलटण नगर परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण खुले झाल्याने राजे गटाकडून श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे, तर भाजपा व महायुतीकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नावे चर्चेत आहे. फलटण नगर परिषदेची अध्यक्षपदाचे सोडत जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटाकडून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भावी नगराध्यक्ष म्हणून आपापल्या नेते मंडळींची रिल्स व फोटो यांच्या पोस्ट टाकण्यास सुरुवात केली असून आजपासून नगरपरिषदेच्या निवडणुकीचे रंगतदार वातावरण सुरू झाले आहे.

एकीकडे भाजपा व महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार म्हणून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव सध्या चर्चेत असून खासदार गटाकडून सोडत झाल्यानंतर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालीला वेग आला आहे. दुसरीकडे राजे गटाकडून श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे करण्यात येत असून राजे गटही सोडत झाल्यानंतर सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

येणाऱ्या काळात निवडणुकीचा कमी कालावधी पहाता राजकीय घडामोडी फार वेगात व रंगतदार होणार असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे. दोन नाईक निंबाळकर यांच्यात सरळ लढाई होणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी मनोमिलनाच्या विषयाला जाहीर ब्रेक लावला असून जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषद निवडणुका पहाता अनेक राजकीय घडामोडी येत्या काही दिवसांत घडणार असून अनेक राजकीय धक्के तालुक्यात जाणवणार असल्याचे बोलले जात आहे.

येणाऱ्या निवडणुकीत महायुती एकत्रित येऊन निवडणुका लढणार की प्रत्येक पक्ष ( भाजप, अजित पवार राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना (शिंदे गट)) स्वतंत्र ताकद अवलंबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी शरद पवार व काॅंग्रेस यांच्यातही एकमत न झाल्यास ते ही स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फलटण नगर परिषद निवडणुकीत खासदार गट व राजे गट अशी सरळ लढाई होणार असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

अनेक राजकीय मंडळी नगरसेवक पदाकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचे बोलले जात असून येणाऱ्या काळात खासदार गट व राजे गट दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांना राजकीय अस्थिरता क्षमवून फलटण नगर परिषद निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.अनेक राजकीय नेते मंडळींनी फलटण नगरपरिषदेच्या सोडतीच्या आरक्षणाबाबत वेगवेगळी भविष्यवाणी केली होती काहींनी तर तयारीही केली होती परंतु आज जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक जण नाराज झाले असून आजच्या जाहीर झालेल्या सोडती पाहता पुढील राजकीय हालचालीला वेग आला आहे.

आज सकाळपासूनच फलटण शहरात ठीक ठिकाणी राजकीय कोपरा बैठका होण्यास सुरुवात झाली आहे.सोशल मीडियावर दोन्ही गटाकडील कार्यकर्त्यांनी भावी नगराध्यक्षांना प्रमोट करण्यास सुरुवात केली असून सोशल मीडियावर पोस्टवर पोस्ट टाकण्यास चांगलीच चढावर सुरू होती.

येणाऱ्या काळात “मनोमिलन भाग २” होण्याची शक्यता असून “मनोमिलन भाग १” ने फलटण तालुक्यासह राज्यात राजकीय वातावरण गरम केले होते काही कारणाने “मनोमिलन भाग १” झाला नसल्याचे बोलले जात असले तरी येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषद निवडणुका पहाता “मनोमिलन भाग २” होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”मनोमिलन भाग १” ने पोटात गोळा आलेल्या स्वघोषित नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी “मनोमिलन भाग २” ची धास्ती घेतली असून आता “मनोमिलन भाग २” काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकारणात कधीही कोठेही कसेही काहीही होऊ शकते हे जनतेने मागील काही वर्षापासून पाहिले आहे. एकंदरीतच येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका चांगल्याच रंजक होणार आहेत.

error: Content is protected !!