फलटण नगर परिषदेत ३० वर्षांनंतर मागासवर्गीय विशेष कल्याण समिती स्थापनेची ठाम मागणी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी

फलटण नगर परिषदेमध्ये मागील तब्बल ३० वर्षांपासून मागासवर्गीय विशेष कल्याण समिती स्थापन करण्यात आलेली नसल्याने मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आता या विषयाला अधिकृत पातळीवर वाचा फुटली आहे.

सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीत फलटण नगर परिषदेमध्ये मागासवर्गीय विशेष कल्याण समिती तातडीने स्थापन करण्यात यावी, अशी ठाम मागणी नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नगरसेवक सचिन अहिवळे, अमित भोईटे, राहुल निंबाळकर उपस्थित होते.

निवेदनात सौ. अहिवळे यांनी नमूद केले की, मागासवर्गीय समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र समिती अत्यावश्यक आहे. अशा समितीच्या माध्यमातून विविध शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबविता येतील, तसेच या समाजासमोरील अडचणी, समस्या व मागण्या थेट नगर परिषदेत मांडण्यासाठी एक सक्षम आणि अधिकृत व्यासपीठ उपलब्ध होईल.

नगर परिषद क्षेत्रात सर्व समाजघटकांचा समतोल व सर्वांगीण विकास साधायचा असल्यास मागासवर्गीय विशेष कल्याण समितीची स्थापना ही केवळ गरज नसून अनिवार्य बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता नगर परिषद प्रशासन या मागणीची दखल घेऊन तातडीने निर्णय घेते का, याकडे फलटणमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!