फलटण प्रतिनिधी: वाचणार्या पाण्याचा गवगवा करुन माजी खासदार ते पाणी पंढरपूर, सांगोल्याला द्यायला निघाले होते. आता सांगोला-पंढरपूरही बाजूला राहिलेत आता ते पाणी तिसरीकडेच निघाले आहे. नीरा-देवघरच्या पाण्यावर फलटण, खंडाळ्याचाच हक्क आहे काही झालं तरी आम्ही मात्र आमच्या हक्काचं पाणी आमच्याच तालुक्यात ठेवण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांनी केले.

सासवड, ता. फलटण येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, डॉ. बाळासाहेब शेंडे, धनंजय पवार, धैर्यशील अनपट, सरपंच राजेंद्र काकडे उपस्थित होते. संजीवराजे पुढे म्हणाले की, आ. रामराजेंनी पाणी प्रश्नासाठी मोठा संघर्ष केला आहे. पाण्यावर हक्क प्रस्थापित केला, ते अडवले. त्यामुळे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला. माजी खासदार म्हणतात मी पाणी आणलं. कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती झाली. तेव्हा तुम्ही कुठेतरी शिक्षण घेत होता. किती बाता माराव्यात. तुम्ही शांत बसला असता, पाणी वाचल्याचा गवगवा केला नसता तर तालुक्याला संघर्षाशिवाय त्यांच्या हक्काचं पाणी मिळालं असतं. आता वाचणारे पाणी तिसरीकडे चालले आहे. काहीही झालं तरी आम्ही मात्र ते पाणी इतरत्र कुठेही जाऊ देणार नाही.बंदिस्त पाईपलाईनमुळे नीरा-देवघरच्या वाचणार्या पाण्यावर प्राधान्याने फलटण, खंडाळ्याचाच हक्क आहे. हे हक्काचे पाणी त्यांनाच देण्याशिवाय दुसरा पर्याय आम्हाला मान्यच नाही.

संजीवराजे पुढे म्हणाले की, राजकारणात ज्यांना मोठं केलं ते इथे लाभ घेऊन आता लाभासाठीच तिकडे पळालेत. गेलेत ते जाऊ द्या. गुळगुळीत झालेलीच गेली. तसंही ती आता चालणारच नव्हती. आपण नव्या दमाचे तरुण नेतृत्व उभे करून आ. रामराजेंनी तालुक्यात सुसंस्कृत राजकारणाची बसवलेली घडी विस्कटणार्या प्रवृत्तीला रोखण्याचे काम करूया. खचून न जाता कामाला लागा.

माजी आमदार दीपक चव्हाण म्हणाले, आ. रामराजेंच्या माध्यमातून तालुका प्रगतिपथावर आहे. तालुक्यात शैक्षणिक, हरित, औद्योगिक क्रांती झाली आहे. इथून पुढे येणार्या सर्व निवडणुका आ. रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली ताकतीने लढवणार आहोत. विद्यमान आमदारांना फारच ज्ञान आल्याने ते त्यांच्या सल्लागारांच्या सांगण्यावरुन आम्ही मंजूर केलेली कामे रद्द करुन दुसरी कामे करण्याच्या सूचना देत आहेत.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता अनपट म्हणाले, आ. रामराजेंच्या माध्यमातून तालुक्यात चौफेर विकास झाला आहे. पाणी, उद्योग, ऊस कारखाने यासाठी त्यांनी यशस्वी संघर्ष केला आहे. १९९५ ला पाणी प्रश्नासाठी आ. रामराजेंनी तत्कालीन सरकारला पाठिंबा दिला. आ. रामराजेंच्या आग्रहातूनच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींनी कृष्णा खोरे महामंडळाच्या स्थापनेची घोषणा फलटण येथील कार्यक्रमात केली होती असे सांगितले.सासवड, ता. फलटण येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थिती होते.