फलटण प्रतिनिधी :- फलटण तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात कार्यरत असणार्या नायब तहसीलदार श्रीमती भक्ती सरवदे – देवकाते त्यांच्यावर आठ दिवसांत कडक कारवाई न झाल्यास प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे तहसिल कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात कार्यरत नायब तहसीलदार श्रीमती भक्ती सरवदे – देवकाते या दिव्यांग, विधवा तसेच ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्तींना अरेरावीची भाषा वापरून हीन स्वरुपाची वागणूक देतात. दिव्यांगांनी कोणत्याही समस्येबाबत त्यांना विचारले असता माझ्याकडे अधिकार नसून सर्व अधिकार तहसीलदारांना आहेत अशी उत्तर देतात. तसेच संजय गांधी निराधार योजनेची मंजुरी पात्र लाभार्थी यादी लावण्यास विलंब, वेळेवर मिटिंग न घेणे, एक वर्षापासून लाभार्थी लाभापासून वंचित ठेवलेले आहेत. अशा बेजबाबदार अधिकार्यावर सेवा हमी कायदा व दप्तर दिरंगाई कायदा अंतर्गत कारवाई करावी. संबंधितांवर आठ दिवसांत कारवाई न झाल्यास जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे तहसिल कार्यालय समोर प्रहार ठिय्या आंदोलन करणार आहोत असे निवेदन देण्यात आले आहे.
अनेक दिवसापासून फलटण तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागाबाबत लाभार्थ्यांकडून तक्रारी येत आहेत. वेळेत सेवा न देणे, लाभार्थ्यांना माहिती न देणे, नियमानुसार मीटिंग न घेणे, जाणीवपूर्वक लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवणे, लाभार्थ्यांची उद्धटपणे बोलणे व ईतर तक्रारीचा पाढा लाभार्थ्यांकडून वाचला जात होता. फलटण तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागातील योजनेतील बोगस लाभार्थी बाबत काही तक्रारी होत नागरिकांच्यातून असताना प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक झाली असून येणाऱ्या काळात बोगस लाभार्थीबाबत व नायब तहसीलदार यांच्या तक्रारीबाबत प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.