महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण – सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सातारा जिल्ह्यातील शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेच्या वतीने सोमवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय फलटण येथे आयोजित करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. यामधील यशस्वी स्पर्धकांना लौकरच होणाऱ्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात समारंभ पूर्वक पारितोषिके शिक्षण आयुक्त / शिक्षण संचालक यांच्या हस्ते देण्यात येतील. तरी सर्व शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे अध्यक्ष, रवींद्र बेडकीहाळ, संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे केले आहे.
स्पर्धेबाबत संयोजन समितीचे प्रमुख महादेवराव गुंजवटे, प्राचार्य शांताराम आवटे व कार्यवाह ताराचंद्र आवळे, अमर शेंडे यांनी तपशीलवार माहिती देताना नमूद केले आहे की, सदर स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे आहेत. १) शिक्षणातील बदल, विद्यार्थी गुणवत्ता वाढ संधी व आव्हाने. २) स्व.यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य व संस्कृती मधील योगदान. ३) प्राचार्य शिवाजीराव भोसले एक चिंतन. यापैकी स्पर्धकाने निवडलेल्या एका विषयावर बोलण्यासाठी स्पर्धकाला १० मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृति करंडक दिला जाईल. तसेच पहिल्या तीन यशस्वी स्पर्धकांना अनुक्रमे रुपये १५००/- रुपये, १०००/- रुपये, ₹ ५००/- रुपये रोख पारितोषिक, एक ग्रंथ व प्रशस्तीपत्रक दिले जाईल.
इच्छुक शिक्षकांनी त्यांच्या शाळा प्रमुखांच्या शिफारशी सह आपली नावे पूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांकासह दिनांक २७ डिसेंबर २०२४ पर्यंत श्री.महादेव गुंजवटे मो.९८६०७५४४५७, अमर शेंडे मो.९९२२७७८३८६, सौ.अलका बेडकिहाळ मो.८३८००३५३२१ यांच्याकडे व्हाट्सअपद्वारे किंवा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा कार्यालय ३२२, कसबा पेठ, शंकर मार्केट, बकुळीच्या झाडाखाली, फलटण, जिल्हा सातारा येथे समक्ष पोस्टाने पाठवावेत, असेही आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले आहे.