फलटण पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग; नाईक निंबाळकरांच्या निवासस्थानी अचानक बैठक

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : फलटण पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या क्षणी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सभापती निवडीला अवघी काही मिनिटे शिल्लक असताना झालेल्या एका अचानक भेटीने राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे निंबाळकर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच फलटण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले हे शिवसेना नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी अचानक दाखल झाले. सभापती निवडीची प्रक्रिया सुरू होण्यास काहीच वेळ बाकी असताना झालेल्या या भेटीमुळे फलटणच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार पंचायत समितीतील सत्तासमीकरणे आणि सभापती पदाच्या निवडीसंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही सदस्यांच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून या भेटीमागे नेमके कोणते राजकीय गणित आहे, याबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी काही प्रमुख इच्छुकांची नावे चर्चेत असून शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

त्यामुळे सभापतीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.दरम्यान, या अचानक घडलेल्या हालचालींमुळे पंचायत समितीतील पुढील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाल्याने फलटणमध्ये नवे राजकीय समीकरण तयार होणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.सभापती निवडीचा निकाल लागल्यानंतरच या भेटीमागील खरे राजकीय गणित स्पष्ट होणार असून फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या अत्यंत तापलेले पाहायला मिळत आहे.

पंचायत समितीच्या सत्तेची चावी नेमकी कोणाकडे जाणार आणि या शेवटच्या क्षणी झालेल्या बैठकीचा निकालावर काय परिणाम होणार, याकडे आता संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!