यंदाच्या दसरा दिवाळीत रामराज्यात सीमोल्लंघन होणार ? राजकीय पलटावर जोरदार हलचाली

विक्रम चोरमले

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण:-फलटण तालुक्यातील अनेक गावातील पारावर तसेच फलटण शहरातील चौका चौकात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे मोनोमिलनाची, पण हे मनोमिलन साधे सुधे नसून ऐतिहासिक सातारा ते सोलापूरचा माढा या राजकीय पट्ट्यात मागील अनेक वर्षांपासून दोन राजकीय धुरंदर यांच्यात रंगलेल्या राजकीय पलटावरचा खेळ बरोबरीत सोडवण्याची आहे. राजकीय प्रवाहात गरजेनुसार कधी संथ तर कधी वेगात वाहत भविष्याचा वेध घेत ठरलेल्या तहानुसार तालुक्याची राजकीय मोनोमिलनाची परंपरा कायम ठेवण्याची वेळ जवळ आली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी प्रकाशित केलेल्या राजकीय विश्लेषणाच्या बातमीनंतर काही प्रतिक्रिया प्राप्त झाल्या यामध्ये “मोकळ्यात वावड्या उठवल्या”, “तोंडावर पडणार”, “फुसका बार”, “वायफळ चर्चा”, “पेरलेली बातमी”, “पेड न्यूज”, “शक्यच नाही”, “फुसका भूकंप” अशी शीर्षके देत राजकीय विश्लेषणाच्या वार्तापत्रास हसणाऱ्या तालुक्यातील स्वघोषित नेतेमंडळी तसेच कार्यकर्ते यांनी बातमी मागील बातमीस प्रतिक्रिया दिल्या गेल्या पण एकही राजकीय नेता अथवा सक्षम कार्यकर्त्या राजकीय मोनोमिलनावर स्पष्टपणे बोलण्यास तयार झाला नाही.

कोणीही ठामपणे फलटण तालुक्यासह राज्याच्या पलटावर सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर बोलण्यास तयार नाही. परिपक्क राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा राजकीय शत्रू नसतो एकमेकांच्या राजकीय संघर्षात अनेक संधी गमावलेल्या राजकीय नेतृत्वांना योग्य वेळी योग्य तह करण्याची बुद्धी निसर्ग नेहमी देत असतो. राजकीय अस्तित्वाच्या लढाईत मिळालेल्या संधीचे सोने करून म्हणजेच तहाचे राजकारण करण्याची परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणात याच बरोबर फलटणच्या राजकारणात पूर्वीपासून कायम आहे.

क्षणभर विचार करून राजकीय भवितव्य पणाला लावण्याची वेळ आता राहिली नाही ही बाब लक्षात आल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणूक तसेच नगरपालिका निवडणुकीत मुख्यपदावरती विराजमान होण्याची संधी फलटण तालुक्याला असून राजकीय भवितव्याच्या विचारापासून दूरवर संबंध नसणाऱ्या काहीना मनोमिलनाची बाब जरी पटत नसली तरी अशा मंडळींना येणाऱ्या काही दिवसात याची देही याची डोळा पाहण्यास मिळणार आहे.

राजकारणात स्वतःच्या उंची न बघता नको तिथं मुक्ताफळे उधळणाऱ्या सुघोषित नेते व कार्यकर्ते यांची चांगलीच पंचायत काही दिवसांवर येवून ठेपली आहे. जेवढा होईल एवढा विरोध करून राजकीय मनोमिलन होणार नाही याचा प्रयत्न एकीकडे होताना दिसत आहे.

दिल्लीपासून फलटणच्या गल्लीपर्यंत एकच मनोमिलनाची चर्चा सुरू आहे यापूर्वीच्या राजकीय विश्लेषणाच्या बातमीनंतर काहीशी सावध झालेली राजकीय मंडळी सैरभर झाली आहेत.यापूर्वी झालेलं सर्व काही राजकीय वैर संपवून राजकारणात नवी दिशा घेऊन फलटण तालुक्याचे राजकारण यापुढे सुरू होणार आहे.

नैसर्गिक आपत्ती व योग्य वातावरण याचा योग जुळवून येत्या दसरा दिवाळीत रामराज्यात सीमोल्लंघन होणार आहे. याबाबत राजकीय पलटावर जोरदार हलचाली सुरू आहेत सर्व काही तयारी पूर्ण झाली आहे फक्त शेवटचा हात फिरवायचा बाकी आहे.

तालुक्यातील दोन्ही दिग्गज नेतेमंडळी यांचे मनोमिलन न झाल्याने तिसऱ्याच फायदा होत असल्याची बाब यापूर्वीच झालेल्या निवडणुकीच्या निकालाने समोर आल्याने तालुक्यातील राजकीय भविष्य तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा तालुक्यातच यापुढे सुटणार आहे. येणाऱ्या काळात 2029 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका असो वा इतर स्थानिक निवडणुका असो तालुक्याच्या विकासाचा गाडा मनोमिलनाशिवाय सुटणार नसल्याचे बोलले जात आहे यास दोन्ही दिग्गज नेतेमंडळीचा पण होकार आहे.

कटू संघर्षामुळे मोठा राजकीय परिमाण फलटण तालुक्याच्या राजकारणावर झाला असून आता हा संघर्ष बाजूला ठेवून नवा अध्याय सुरू होऊ ठाकला आहे. मनोमिलनास दोन्ही गटाकडील काही कार्यकर्त्यांचा विरोध होत असल्याचे पाहता आता विकासाच्या दृष्टीने राजकारणात आघाडी घेण्यासाठी मनोमिलनाचा निर्णय न बदलण्याची भूमिका घेण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

येणाऱ्या काळात राजकीय पक्ष प्रवेश झाल्यानंतर फलटण तालुक्याच्या राजकारणात तिसरी आघाडी जोर धरणार असून काही नाराज नेते व कार्यकर्ते तिसऱ्या आघाडीकडे म्हणजेच अजितदादा पवार गटाकडे वळणार आहेत तर काहीजण पुन्हा घर वापसी करणार आहेत. महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्त्वाचा पक्ष म्हणजेच अजितदादा पवार गट फलटण तालुक्यातील राजकीय घडामोडीकडे लक्ष देऊन असून तिसऱ्या आघाडीला ताकद देऊन फलटण तालुक्याच्या राजकारणात तिसरा पर्याय म्हणून उभा करण्याचा प्रयत्न या तिसऱ्या आघाडीकडून होताना दिसणार आहे.

जाहीर मनमिलनाच्या नंतर दोन्ही नेते मंडळी विरोध करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना राजकीय भविष्य व संधी यावर मार्गदर्शन करून मनोमिलनाचे सूत्र समजावून पुढे जाण्याचा सल्ला दोन्ही नेतेमंडळी देणार आहेत. येणाऱ्या काळात ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील राजकीय मनोमिलन अनेक जणांच्या बत्ती गुल करणार आहे. मागील राजकीय काळ पाहता अजितदादा पवार गट फलटण तालुक्याला किती ताकद देईल आणि या ताकदीच्या जीवावर तिसरी आघाडी किती टिकेल हे येणारा काळ ठरवणार आहे.

error: Content is protected !!