महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी :शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी आणि शासन यंत्रणा कमी पडली आहे, त्याचप्रमाणे या गंभीर प्रश्नाची वेदना प्रभावीपणे मांडण्यात साहित्यिकही कमी पडले आहेत, अशी स्पष्ट व परखड भूमिका अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.
वारकरी संप्रदायाला समर्पित ३० वे विभागीय साहित्य संमेलन व १४ वे स्व. यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलन फलटण येथे पार पडले. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.पाटील म्हणाले, “शेतकरी आत्महत्यांवर आधारित साहित्य अपेक्षेइतके निर्माण झालेले नाही. आपण कोरोना महामारीसारख्या भयानक संकटावर मात करू शकलो, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का रोखू शकत नाही? हा प्रश्न केवळ प्रशासनाचा नाही, तर संवेदनशील समाजमन घडवणाऱ्या साहित्यिकांचाही आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक प्रखरपणे, अधिक संवेदनशीलतेने मांडले गेले पाहिजेत. जीवनाची भाषा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला शिकवली आहे.”ते पुढे म्हणाले, “‘पानिपत’ कादंबरी लिहिण्याची पहिली सुरुवात फलटण येथून झाली. फलटणच्या मातीत साहित्यिक घडतात. सुरेश शिंदे यांची ‘सर्ज्या’, विलास वरे यांची ‘बा’, संपत टेंबरे यांची ‘हंटर’ ही कादंबरी मी वाचली आहे. फलटणने मराठी साहित्याला दर्जेदार योगदान दिले आहे.
नव्या साहित्यिकांनी मराठी भाषेचा सखोल अभ्यास केला पाहिजे. मराठीतील एक ओळ ही इतर कोणत्याही भाषेतील हजार पानांच्या साहित्यापेक्षा श्रेष्ठ आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी संमेलनाध्यक्ष हभप सुरेश महाराज सुळ, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ. सचिन बेडके-सूर्यवंशी व संयोजक रविंद्र बेडकिहाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या संमेलनात साहित्यिक जगन्नाथ शिंदे यांना यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार, सुनीताराजे पवार यांना वेणुताई चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, तर फलटण येथील इंदिरा महिला सहकारी संस्थेस सौ. सुलेखा शिंदे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.साहित्य परिषद फलटण यांच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले. महादेव गुंजवटे, अमर शेंडे, ताराचंद्र आवळे, अलकाताई बेडकिहाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

