फलटण :- फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून दीपक चव्हाण यांचा पराभव झाला तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात सचिन पाटील हे विजयी झाले. त्या अनुषगाने काल शरद पवार राष्ट्रवादी पक्ष राजे गटाचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा सुद्धा पार पडला.यामध्ये कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन झाले पण या मेळाव्यास श्रीमंत रामराजे यांचे अनुपस्थिती होती.
त्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी “झालेल्या चुका मान्य करून संघर्षाला सुरुवात. सुरक्षित, आधुनिक, संपन्न सातारा जिल्ह्यासाठी” असे मत WhatsApp स्टेटस द्वारे व्यक्त केले आहे. श्रीमंत रामराजे यांचा WhatsApp स्टेटस चांगलाच व्हायरल होत आहे.फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये श्रीमंत रामराजे हे निवडणूक प्रक्रिया कुठेही प्रत्यक्ष सामील झाले नव्हते. दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ अनेक ठिकाणी श्रीमंत रामराजे यांनी खाजगी बैठका घेतल्या होत्या प्रत्यक्षपणे कोणत्याही व्यासपीठावर ते हजर नव्हते.
येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांनी का नाकारले? राजे गट कुठे कमी पडला? याच बरोबर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील अंतर्गत कुरघोड्या यावर आवर घालण्यात व झालेल्या चुका सुधारण्यात राजे गट प्रभावी ठरणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.मागील काळात झालेल्या चुका सुधारत राजे गट पुन्हा संपूर्ण ताकतीने उतरण्याची तयारी करत असून विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागले असून यासोबतच आगामी काळामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा प्रत्यक्ष सक्रिय होत राजे गटाची मूठ बांधण्याची जबाबदारी स्वीकारून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सत्ता अबाधित ठेवण्याठी महत्त्वाची भूमिका श्रीमंत रामराजे यांनी पार पडण्याची आवश्यकता आहे.
ई. व्ही.एम मशिनला दोष देण्यापेक्षा राजे गटाकडून अनेक लहान मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत त्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. राजे गटाला आगामी काळात तालुक्यात पुन्हा सक्षम व्हायचे असेल तर जनतेमध्ये प्रत्यक्ष उतरून काम करावे लागणार आहे. जोपर्यंत पूर्वी केलेल्या चुका सुधारत नाही तोपर्यंत राजे गटाला फलटण तालुक्याचा अपेक्षित यश मिळेलच असे नाही हे मत सर्वसामान्य कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.आता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.