श्रीराम रथोत्सव परंपरागत पध्दतीने भक्तिपूर्ण वातावरणात साजरा

फलटण : संस्थान काळापासून सुरू असलेली येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा यावर्षीही फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत परंपरागत पध्दतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली.

नाईक-निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे २५० वर्षांपूर्वी रथयात्रेची सुरू केलेली परंपरा आजही परंपरागत पध्दतीने सुरू आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. आज सोमवार दिनांक २ रोजीसकाळी ८:३० वाजता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन झाले. त्यानंतर प्रभू श्रीराम, सीता मातेच्या मूर्ती रथामध्ये ठेवून त्यांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. फळे, फुले, पाने आणि विविधरंगी निशाणे लावून उसाच्या मोळ्या बांधून सजविलेला हा रथ नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला.

यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. मिथिलाराजे नाईक निंबाळकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासह राजघराण्यातील मानकरी व भाविक उपस्थित होते.

श्रीराम मंदिरापासून नगरप्रदक्षिणेसाठी निघालेल्या या रथाचे शिंपी गल्लीतून बारामती चौक मार्गे नगरपरिषद कार्यालया-समोरील चौकात आगमन झाले. त्यानंतर रथयात्रा ज्ञानेश्वर मंदिर, प. पू. गोविंद महाराज उपळेकर मंदिर, डेक्कन चौक, म. फुले चौक, मारवाड पेठ मार्गाने बारस्कर चौक, रंगारी महादेव मंदिरापासून बाणगंगा नदीपात्र, मलठण भागातील सद्‌गुरू हरीबुवा मंदिरापासून फिरत गजानन चौक या मार्गाने सायंकाळी पुन्हा श्रीराम मंदिरासमोरील रथखाण्यात पोहोचला.

दरम्यान, रथ प्रदक्षिणेच्या मार्गावर ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आलेल्या अबालवृध्दांनी प्रभू श्रीरामाचे शहरात ठिकठिकाणी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. शहरवासीयांनी रथमार्गावर सडा रांगोळ्या घालून प्रभू श्री रामाचे स्वागत केले. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी थांबून शहरवासीय आणि ग्रामीण भागातील तसेच परगावच्या भक्त मंडळींनी प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. या रथोत्सवासाठी बारामती, इंदापूर, पुरंदर, खंडाळा, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यातून भाविक मोठ्या संख्येने आले होते. नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई आणि अन्य शहरात असलेले येथील रहिवासीही आपल्या कुटुंबीयांसह रथयात्रेसाठी आणि प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आले होते.

रामरथोत्सवाच्या निमित्ताने येथे जवळपास ८ ते १० दिवस मोठी यात्रा भरते. त्यामध्ये मेवा मिठाईची दुकाने, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, स्त्रियांची विविध आभुषणे, बंागड्यांच्या दुकानांचीही रेलचेल असते. संसारोपयोगी साहित्य, कपडे यांचीही दुकाने असतात. विविध प्रकारची करमणुकीची साधने व खेळ, उंच उंच पाळणे, रेल्वे, फिरती चक्रे आदी मनोरंजनाची व लहान मुलांचे आकर्षण ठरणारी साधनेही या यात्रेत दाखल झाली आहेत.रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त सगळीकडे नेमण्यात आला होता.

error: Content is protected !!