फलटण तहसील पुरवठा विभाग बनला ‘बैठकीचा अड्डा’? नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष असल्याची तक्रार

फलटण (प्रतिनिधी) : फलटण तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग हा सध्या नागरिकांच्या कामांसाठी कमी आणि खाजगी अनधिकृत कर्मचाऱ्यांच्या बैठका, गप्पा-टप्पांसाठी जास्त वापरला जात असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. रेशनकार्ड, नाव दुरुस्ती, नवीन नोंदणी, धान्य वितरणाबाबतच्या तक्रारी यांसाठी नागरिक दिवसभर हेलपाटे मारत असताना कार्यालयात मात्र “बैठकींचा अड्डा” सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नागरिक सांगतात की, सकाळपासूनच पुरवठा विभागात काही खाजगी कर्मचारी व काही व्यक्ती तसेच एजंट एकत्र बसून गप्पा आणि मोबाईलवर वेळ घालवत असल्याचे दिसते. कामासाठी आलेल्या नागरिकांना “नंतर या”, “साहेब नाहीत”, “प्रकरण तपासाव लागेल” अशा कारणांनी ताटकळत ठेवले जाते. त्यामुळे साध्या कामासाठीही नागरिकांना अनेक दिवस चकरा माराव्या लागत आहेत.

विशेष म्हणजे गरीब व सर्वसामान्य नागरिकांना अन्नधान्याशी संबंधित कामांसाठी या विभागावर अवलंबून राहावे लागते. मात्र कामकाजाची गती अत्यंत संथ असल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत आहे. काही नागरिकांनी तर “कार्यालयात कामापेक्षा बैठक आणि गप्पाच जास्त चालतात” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

स्थानिक नागरिकांच्या मते, जर पुरवठा विभागात शिस्तबद्ध कामकाज झाले तर अनेक तक्रारी तत्काळ निकाली निघू शकतात. परंतु कार्यालयीन शिस्त नसल्याने लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना याला भेटा त्याला भेटा असे सांगून पिटाळून लावत आहेत.

दरम्यान, तहसील प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुरवठा विभागातील कामकाजाची तपासणी करावी आणि नागरिकांची गैरसोय थांबवावी तसेच याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!