फलटण प्रतिनिधी: फलटण तालुक्यात गूढ आवाजाची मालिका कायम असून, मंगळवारी (दि.१) सकाळी ९.०० वाजता मोठा गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. ब्लास्टिंग सारख्या आवाजाप्रमाणेच हा गूढ आवाज असल्याचे सांगण्यात येत होते. या आवाजाबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमावस्था कायम असून, तालुका प्रशासनाकडून याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण शहरा लगतच्या भागात मोठा गूढ आवाज झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ब्लास्टिंग सारखा मोठा आवाज झाल्याने भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली होती. फलटण शहरासह तालुक्यात मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास गूढ आवाज झाला.
या अचानक अालेल्या या गूढ आवाजामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर अनेकांकडून तर्क लावण्यात येत होते.काही ठिकाणी पत्रे तर काहींच्या घरातील व दुकानातील काचा हादरल्याचे सांगण्यात आले. जमिनीतून स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला. या आवाजाने घरावरील पत्रे हादरले. तर काहीजण घाबरून घरातून बाहेर आले. ब्लास्टिंग सारख्या अचानक झालेल्या या आवाजामुळे काही नागरिकांत ब्लास्टिंग तर काही नागरिकांत भूकंप झाल्याची चर्चा होती.
तालुका प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही. सततच्या गूढ आवाजामुळे फलटण तालुक्यातील नागरिकांच्या मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुका प्रशासनाने तत्काळ याबाबत सविस्तर चौकशी करून नागरिकांना माहिती देण्याची मागणी होत आहे.