फलटण येथील प्रसिद्ध घोड्याच्या यात्रेस प्रारंभ; यात्रेचा मुख्य दिवस दिनांक १८ एप्रिल रोजी

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १६ एप्रिल २०२५ l

महानुभाव पंथाची दक्षिण काशी व ऐतिहासिक दृष्टीने महत्व प्राप्त झालेल्या श्री. क्षेत्र फलटण येथील घोड्याच्या यात्रेस म्हणजेच श्री चक्रपाणी प्रभू पालखी महोत्सव व यात्रेस प्रारंभ झाला असून शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून हजारोच्या संस्थेने भाविक यात्रेस दाखल होत आहेत.

सदर यात्रेची कार्यक्रम रूपरेषा पुढील प्रमाणे असून दररोज संध्याकाळी महाआरती नंतर ठीक सायंकाळी ७ वाजता श्रीकृष्ण मंदिरातून छबिना वाद्यांचा गजरात निघून रात्री १० पर्यंत श्रीमंत आबासाहेब मंदिरात पोहचतो व तेथील महाआरती संपन्न होते. यात्रेच्या मुख्य दिवशी दि. १८ एप्रिल रोजी दुपारी ठीक १ वाजता श्रीमंत आबासाहेब मंदिर येथून स्थान पूजन व पालखी पूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होऊन छबीना नगर प्रदक्षिणेला निघणार आहे.

छबिना श्रीमंत आबासाहेब मंदिर येथून तेली गल्ली मार्गे, श्रीकृष्ण मंदिर, व तेथून शुक्रवार पेठ मार्गे रंगारी महादेव मंदिरापासून, अवस्थान मंदिर, व पुढे बाणगंगा नदी येथून शुक्रवार पेठ मार्गे, पुन्हा श्रीकृष्ण मंदिर व रात्री ७ वाजता पुन्हा श्रीमंत आबासाहेब मंदिर येथे पोहोचेल. या ठिकाणी महाआरती होईल अशी माहिती श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे.यात्रेनिमित्त श्रीकृष्णनाथ, श्री आबासाहेब, श्री बाबासाहेब, जन्मस्थान (अवस्थान मंदिर), रंगशीळा, श्रीदत्त या मंदिरांमध्ये यात्रेसाठी महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, हिमाचल, तेलंगणा, राजस्थान, गुजरात राज्यातून आलेल्या भाविकांची ५ ते ६ दिवस मोठी गर्दी असते.

यात्रेनिमित्त सर्व मंदिरांची स्वच्छता व रंगरंगोटी पूर्ण करण्यात आली आहे. यात्रेच्या निमित्ताने मेवा मिठाई, खेळण्यांची त्याचप्रमाणे नारळ आणि पूजेच्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत. पालखी सोहळ्याच्या मार्गावर आणि मंदिरालगत शहरातील विविध तरुण मंडळे, गणेशोत्सव मंडळे, विविध मठ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भक्त मंडळींसाठी पिण्याच्या पाण्याची, थंड सरबत, आईस्क्रीम, कुल्फी, ताक, लस्सीची मोफत व्यवस्था केली जाते. काही मंदिर परिसरात भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.श्रीमंत आबासाहेब मंदिरा पाठीमागील रंगशिळा मंदिर या परिसरामध्ये वाहन लावण्याकरिता व्यवस्था करण्यात आली आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून संपूर्ण भारतात ओळख असणाऱ्या फलटणची घोड्याची यात्रा पहाण्यासाठी यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविक येत असतात. घोड्याच्या यात्रेस भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!