कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मान

फलटण प्रतिनिधी :जावली तालुक्यातील कर्णेवाडी येथील कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी या व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत राजनंदिनीने आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.राजनंदिनी लहानपणापासूनच वक्तृत्व आणि मनोगत व्यक्त करण्यात कुशल आहे. इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यापूर्वीच ती विविध कार्यक्रमांमध्ये प्रभावीपणे आपले विचार मांडत होती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तिच्या वक्तृत्व कौशल्याचे कौतुक केले आहे.तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत तिने प्रभावी भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली आहेत.

त्यामुळे ती त्यांच्या कार्यक्रमांमधील एक आकर्षण ठरली असून अनेक ठिकाणी तिच्या वक्तृत्वाची चर्चा होत आहे.राजनंदिनीने राज्यभर आयोजित विविध शासकीय व खाजगी वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होत आपल्या वक्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. बारामती, सांगोला आणि सांगली येथे खुल्या गटातील स्पर्धांमध्येही तिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

याशिवाय ती उत्तम कथाकथनकार म्हणूनही ओळखली जाते. बारामती तालुक्यातील मुर्टी येथे झालेल्या अक्षर मानव साहित्य संमेलनात, माण तालुक्यातील येळेवाडी येथे आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात तसेच सांगली येथील साहित्य संमेलनात तिने प्रभावी कथाकथन सादर केले आहे.प्रसिद्ध कथाकथनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी तिला कथाकथनासाठी प्रेरणा दिली आहे.

यावेळी शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. राजनंदिनीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रांतून तिचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!