फलटण–दहिवडी रस्त्यावर पुलाचे काम; तात्पुरत्या पुलामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका वाढला

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण : फलटण ते दहिवडी रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून शहराच्या हद्दीवरील खडकहिरा व कोळकी येथील बुवासाहेब मंदिराजवळील ओढ्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. मात्र या विकासकामाचा फटका नागरिकांना वाहतूक कोंडीच्या रूपाने बसत असून रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

पुलाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीसाठी शेजारीच तात्पुरता पूल उभारण्यात आला असून खाली मोठ्या पाईप टाकून त्यावरून अरुंद मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावरून एकावेळी मर्यादित वाहनांना जाण्याची परवानगी असल्याने सकाळी शाळेच्या वेळेत आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत मोठी वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी वाहनचालकांना बराच वेळ थांबावे लागत आहे.

आरटीओ परिसरात अपघातांचा धोका वाढला

जुन्या गर्ल्स हॉस्टेल परिसरातील फलटण आरटीओ कार्यालयाच्या भागात दररोज छोटे-मोठे अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अरुंद रस्ता, धुळीचे प्रमाण आणि वाढती वाहनसंख्या यामुळे वाहनचालकांसाठी धोका वाढला असून पादचाऱ्यांसाठीही रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे.

स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांनी या ठिकाणी वेग मर्यादा, दिशादर्शक फलक आणि वाहतूक पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करणे आवश्यक ठरत आहे. कोळकी भागातून फलटण शहरात येताना अनंत मंगल कार्यालय आणि महाराजा मंगल कार्यालय मार्गे वळसा घेतल्यास वाहतूक कोंडी टाळणे सोयीचे ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

वाहनचालकांकडून प्रशासनाने वाहतूक नियोजनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. विकासकामाचे स्वागत असले तरी सुरक्षितता आणि सुलभ वाहतूक यांची तडजोड होऊ नये, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे नियोजन करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!