पुणे- वेंकीज कंपनीचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त बावधनमधील कोकाटे वस्ती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे पहाटे अडीचपर्यंत स्पीकरचा दणदणाट सुरू होता. हिंजवडी पोलिसांची एलईडी लाईट आणि मोठया आवाजात ध्वनीवर्धक लावून शांततेचा भंग,ध्वनी प्रदुषण केल्याप्रकरणी वेंकिज कंपनीच्या सरव्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. आदिनाथ संभाजी मते ( रा. वेंकटेश्वरा हाऊस ) असे गुन्हा दाखल झालेल्या सरव्यवस्थापकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकीज कंपनीचे संचालक बालाजीराव यांचा ८ डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने रविवारी कोकाटे वस्ती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रात्री साडेअकरा ते पहाटे अडीच दरम्यान साऊंडच्या भिंती, लेझर लाईट शो केला. तसेच प्रसिद्ध गायकांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात लावलेल्या साऊंडच्या भिंतीमुळे परिसरात दोन्ही प्रदूषण झाले. याबाबत कोकाटे वस्ती परिसरातील रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पहाटे अडीच वाजेपर्यंत हा दणदणाट सुरू असतानाही पोलिसांनी मात्र त्यात हस्तक्षेप केला नाही. त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३३, आर १३१ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक महाले तपास करत आहेत.
