चार भारतीय जवानांच्या हौतात्म्यामुळे रामराजे नाईक निंबाळकरांनी केला मकर संक्रांत कार्यक्रम रद्द

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी –भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील तीन तसेच अकोला जिल्ह्यातील एका जवानाला अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत वीरगती प्राप्त झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या दु:खद पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यंदा मकर संक्रांतीचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेत शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त फलटण येथील ऐतिहासिक लक्ष्मी विलास पॅलेस येथे तिळगुळ व सणसमारंभाचे आयोजन करण्यात येते. मात्र, देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीर जवानांच्या सन्मानार्थ यंदाचा तिळगुळाचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आला. कोणताही उत्सव न साजरा करता शोकभाव व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, “देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या स्मृतीसमोर कोणताही सण साजरा करणे योग्य ठरणार नाही. हा काळ आनंदोत्सवाचा नसून, शोक व्यक्त करण्याचा आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्याचा आहे.”चार जवानांच्या हौतात्म्यामुळे सातारा व अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असून, विविध स्तरांतून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

देशाच्या सुरक्षेसाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीर जवानांच्या बलिदानाला संपूर्ण राष्ट्र नमन करत आहे.

error: Content is protected !!