महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण / सातारा : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून भाजपला वगळून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांमध्ये सातारा येथे झालेल्या कथित गोपनीय बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीबाबत माध्यमांमध्ये विविध तर्क-वितर्क मांडले जात असताना, विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या विषयावर मिश्किल आणि सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
या गुप्त खलबतींबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले,“चहा चांगला होता,”असे सांगत त्यांनी थेट राजकीय भाष्य टाळले. मात्र त्यांच्या या एका वाक्यामुळेच राजकीय चर्चांना आणखी धार आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांमध्ये अलीकडेच भविष्यातील राजकीय समीकरणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संभाव्य आघाड्यांबाबत चर्चा झाल्याची चर्चा आहे.
पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार नितीन काका पाटील उपस्थित होते.
विशेष म्हणजे या बैठकीत भाजपचा सहभाग नसल्याने सत्ताधारी व विरोधी गोटात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुढे बोलताना सांगितले की,“राजकारणात भेटीगाठी होत असतात. चर्चा करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र त्यातून कोणता निर्णय होतो, हे पुढेच स्पष्ट होईल.”असे सांगत त्यांनी विषयावर अधिक बोलणे टाळले.
राजकीय जाणकारांच्या मते, रामराजे नाईक निंबाळकर यांची ही प्रतिक्रिया सूचक आणि रणनीतीपूर्ण असून, सध्याच्या घडीला कोणतीही भूमिका उघड न करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. ‘चहा चांगला होता’ या विधानातून त्यांनी बैठक झाल्याची कबुली न देता तिचे गांभीर्यही कमी दाखवण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा आहे.
दरम्यान, या कथित गोपनीय खलबतींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, भाजपची भूमिका काय असणार आणि आगामी निवडणुकांवर याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वातावरण तापले असले तरी, प्रत्यक्षात काय घडले याबाबत नेतेमंडळींकडून अधिकृत माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.

